पुणे :
’खाण्याच्या चांगल्या सवयी, व्यायाम आणि आनंदी राहण्याकडे कल ठेवावा, आजार, नैराश्य कधीही लपवू नये’, असा सल्ला कॅनडास्थित फिजिशियन डॉ. सय्यद तकी आबिदी यांनी विद्यार्थ्यांना दिला.
‘महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च सेंटर’ आयोजित ‘विद्यार्थ्यांसाठी शारिरीक, मानसिक आरोग्याचे महत्व’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार अध्यक्षस्थानी होत्या.
आझम कॅम्पसमधील ‘हायटेक’ हॉलमध्ये बुधवारी सकाळी हे व्याख्यान झाले. यावेळी मुनव्वर पीरभॉय, डॉ. मुश्ताक मुकादम, डॉ. जालिस अहमद, डॉ.नझिम शेख उपस्थित होते.
डॉ. सय्यद तकी आबिदी म्हणाले, ‘पौगांडावस्थेत शरीरातील अंतस्थ ग्रंथींच्या स्त्रावाच्या चढउतारामुळे (हार्मोनल इम्बॅलन्स) विद्यार्थी -विद्यार्थिनींच्या आयुष्यात, आरोग्यात बदल घडतात. ते लक्षात येत नाहीत. अशावेळी हार्मोन्स्, थायरॉईड, हिमोग्लोबिन तपासून उपचार घेतले पाहिजे. कोणतीही छोटी आरोग्यविषयक समस्या दुर्लक्षित करू नये. विद्यार्थिनींनी हार्मोनल इम्बॅलन्सवर उपचार केले नाहीत तर पुढे जननक्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
विद्यार्थी-विद्यार्थिनींनी खाण्यामध्ये हे आवडत नाही ते खात नाही, असा दृष्टिकोण बाळगू नये. विद्यार्थिनींमध्ये खाण्याच्या आवडी-निवडीमुळे हिमोग्लाबिन कमतरतेची समस्या निर्माण होते.
मानसिक आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी स्वतःच्या आहे त्या व्यक्तिमत्वावर समाधानी असले पाहिजे. अनावश्यक स्पर्धा टाळावी, नैराश्य येत असेल तर वैद्यकीय उपचार घेतले पाहिजेत. रात्री जागरण करू नये. अभ्यासासाठी झोप न येण्याच्या गोळ्या घेऊ नयेत.
विद्यार्थ्यांनी दर 2 वर्षांनी तपासण्या करून त्याची नोंद ठेवण्याची सवय लावून घेतली पाहिजे. पुढील आयुष्यात या नोंदी उपयोगी ठरतात. पाण्याची बाटली सोबत ठेवण्याची साधी सवयही उपयुक्त ठरते.
डॉ. मुश्ताक मुकादम यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आबेदा इनामदार डॉ. सय्यद तकी आबिदी यांच्या हस्ते यांचा सत्कार करण्यात आला.