पुणे :
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ (आझम कॅम्पस )च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ५ हजार विद्यार्थ्यांच्या अभिवादन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते . मिरवणुकीचे उद्घाटन ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांच्या हस्ते सकाळी ८ वाजता झाले . संस्थेचे सचिव लतिफ मगदूम यांनी मिरवणुकीचे नेतृत्व केले . मिरवणुकीचे हे 14 वे वर्ष होते .
राज्यघटनेची प्रत तत्कालीन राष्ट्रपती डॉ राजेंद्रप्रसाद यांना सुपूर्द करतानाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील बैलगाडीवरील जिवंत देखावा हे या मिरवणुकीचे आकर्षण ठरले . या देखाव्यात पंडित जवाहरलाल नेहरू ,वल्लभभाई पटेल ,राजगोपालाचारी ,मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी होते .
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे फलक विद्यार्थी -विद्यार्थीनिनी हाती घेतले होते . जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ आंबेडकर पुतळ्याजवळ एड . प्रकाश आंबेडकर ,महापौर मुक्ता टिळक ,उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी या अभिवादन मिरवणुकीचे स्वागत केले .
संस्थेतील अल्पसंख्यक, ओबीसी, बीसी आणि सर्व धर्मातील विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मिरवणुकीत सहभागी झाले .
दरबार ब्रास बॅण्डची दोन पथके, ढोल – ताशा यांचा मिरवणुकीत समावेश होता
आझम कॅम्पस येथून मिरवणुकीस प्रारंभ होऊन पुना कॉलेज, गोल्डन ज्युबिली, जुना मोटार स्टँड, पद्मजी पोलीस चौकी, भारत सिनेमा, ए. डी. कॅम्प चौक, मॉडर्न बेकरी चौक, संत नरपतगिरी चौक, वीज वितरण कार्यालय, जिल्हा परिषद, मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ मिरवणुकीची सांगता झाली
मिरवणुकीत शाहीद इनामदार,वाहिद बियाबानी, शाहीद मुनीर शेख, अब्दुल वहाब, प्रा. इरफान शेख, प्रा. मुझफ्फर शेख, डॉ. शैला बूटवाला, प्रा. अनिता फ्रान्झ, प्रा.रबाब खान, प्रा.शाहीन शेख, डॉ. किरण भिसे, डॉ.व्ही.एन. जगताप, प्रा. मुमताझ सय्यद, मसकूर चाँद शेख, सिकंदर पटेल, सहभागी झाले.
दरवर्षी एम.सी.ई संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज, म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महंमद पैगंबर यांच्या जयंतीदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी भव्य मिरवणुका काढल्या जातात.


