पुणे ;‘बांधकाम क्षेत्र झपाट्याने वाढत आहे ,मात्र ही बांधकामे पर्यावरणपूरक होण्यासाठी ‘पर्यावरणपूरक बांधकाम साहित्याचा आग्रह सर्वांनी धरला पाहिजे ‘ असे प्रतिपादन हैद्राबाद मेट्रो रेल प्रकल्पाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गाडगीळ यांनी केले .
‘जयसन्स कंस्ट्रक्शन सोल्युशन्स ‘ आयोजित ‘ग्रीन बिल्डिंग सोल्युशन्स ‘ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते . ज्येष्ठ उद्योजक उमेश जोशी ,अच्युत वाटवे, ‘जयसन्स कंस्ट्रक्शन सोल्युशन्स ‘ चे संस्थापक जयंत देवगावकर ,मंदार देवगावकर यांनी या चर्चासत्रात सहभाग घेतला . विवेक गाडगीळ यांनी पर्यावरणपूरक बांधकाम साहित्याच्या प्रदर्शनाचे उद्घाटन केले .
हे चर्चासत्र शनिवारी सायंकाळी हॉटेल रामी ग्रँड येथे झाले .
पर्यावरणपूरक बांधकाम क्षेत्रातील ‘जयसन्स कंस्ट्रक्शन सोल्युशन्स ‘च्या त्रि -दशकपूर्ती योगदानाबद्दल संस्थापक जयंत देवगावकर यांचा यावेळी विवेक गाडगीळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
परव्हिअस सिमेंट पेव्हिंग,सर्फेसिंग (पाण्याला झिरपू देणारा आणि जमिनीतील पाण्याची पातळी वाढविणारा पृष्ठभाग )उष्णतारोधक हिट रेझिस्टंट रिफ्लेक्टिव्ह कोटिंग (न तापणाऱ्या टेरेस साठी ),लाईट वेट इन्सुलेटिंग रेडी मिक्स काँक्रीट (यात थर्माकोल सारखे वेस्ट मटेरियल वापरता येते ) अशा अत्याधुनिक पर्यावरण पूरक बांधकाम साहित्याचा परिचय यावेळी मंदार देवगावकर यांनी करून दिला .
विवेक गाडगीळ म्हणाले ,’ बांधकाम क्षेत्र झपाट्याने वाढत आहे मात्र ही बांधकामे पर्यावरण पूरक होण्यासाठी ‘पर्यावरणपूरक बांधकाम साहित्याचा आग्रह सर्वांनी धरला पाहिजे. त्यासाठी कल्पक आणि अभिनव कामे करणाऱ्या नियोजनकर्त्यांची बांधकाम क्षेत्रात गरज आहे .बांधकाम क्षेत्रात येणाऱ्या नव्या पिढीला पर्यावरणपूरक आणि कल्पक बांधकाम करण्याची मोठी संधी उपलब्ध असून त्यांनी सतत नव्या पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा अभ्यास करत राहिले पाहिजे . ‘
जयंत देवगावकर म्हणाले ,’१९९० पासून बांधकाम क्षेत्रातील तंत्रज्ञान आणि आव्हाने बदलली आहेत . तंत्रकुशल कर्मचारी असतील तर ग्राहकांचे समाधान करण्यात यश येते. ‘
मंदार देवगावकर म्हणाले ,’अत्याधुनिक जागतिक दर्जाच्या बांधकाम साहित्याची स्थानिक पातळीवर निर्मिती साठी आम्ही कार्यरत राहणार असून त्यासाठी संशोधन विकास विभाग पिरंगुट येथे सुरु करण्यात आला आहे . ‘
भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले ,’सिनर्जी हॉलिडे व्हिलेज ‘चे संचालक राजेंद्र आवटे ,’रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन चे अध्यक्ष गणेश जाधव तसेच बांधकाम क्षेत्रातील अनेक मान्यवर या चर्चासत्राला उपस्थित होते . अमृता देवगावकर यांनी सूत्रसंचालन केले .


