सौर ऊर्जा निर्मिती क्षेत्रात ४५ टक्के वाढ’ : डॉ. योगी गोस्वामी यांची माहिती
पुणे :
‘सौर ऊर्जा (सोलर एनर्जी) निर्मितीच्या उद्योगात गेल्या पाच वर्षात झपाट्याने वाढ होत असून, ती सुमारे ४५ टक्के प्रतिवर्ष इतक्या वेगाने वाढत आहे’, असे मत डॉ. योगी गोस्वामी (अमेरिकन संशोधक, उद्योजक लेखक आणि ‘क्लीन एनर्जी रिसर्च सेंटर ऑफ युनिव्हर्सिटी साऊथ फ्लोरीडा’ चे संचालक) यांनी व्यक्त केले.
‘इनो-सोलर एनर्जी प्रा.लि. आणि ‘ऊन्पा इंजिनिअरिंग’ च्या संयुक्त विद्यमाने आयोजित परिसंवादात ‘विनबील्ड’ , ‘ऐम्पोरेस’ व ‘ईन्डीयन सोलरहब’ या अमेरिकेतील कंपन्यानी भाग घेतला.
‘सोलर हायब्रिड इनव्हर्टर आणि पॉवर ऑप्टीमायझर होम एनर्जी सेव्हर युनिट’
या अमेरिकेमध्ये संशोधित व संपुर्ण पणे ‘मेड इन इंडिया युनिट’चे उद्घाटन आबासाहेब शिंदे (राजश्री शाहू बँकेचे अध्यक्ष) यांच्या हस्ते झाले.
यावेळी निलेश ढमढेरे (पुणे अर्बन बँकेचे अध्यक्ष), संजीव पाटील (मुख्य कार्यकारी अधिकारी , श्री सिद्धीविनायक गणपती ट्रस्ट, मुंबई), लोगेश जनार्दन (संचालक, ‘इम्पोरेस’, अमेरिका), अश्विनी जगताप (संचालक, ‘उन्पा इंजिनिअरिंग’ ), आणि उन्मेश जगताप (‘इनो सोलर एनर्जी प्रा.लि.’चे मुख्य कार्यकारी अधिकारी ), बिपीन शहा (सल्लागार, यू एस डिपार्टमेंट ऑफ एनर्जी) उपस्थित होते.
‘इतर कोणत्याही उद्योग धंद्यात इतकी झपाट्याने वाढ होताना दिसत नसून, सौर ऊर्जा निर्मिती क्षेत्रात नव उद्योजकांना मोठी संधी असल्याचे’ मत डॉ. योगी यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले, ‘सौर ऊर्जेमुळे शहराबरोबरच ग्रामीण भागातील घरगुती वीज व शेतीच्या कामासही मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. यामुळे देशाची प्रगती होईल आणि त्याचबरोबर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.’
‘रहिवासी इमारती तसेच व्यावसायिक इमारतींच्या टेरेसवरील सौरऊर्जा निर्मितीस सरकार देखील प्रोत्साहन देत असून, पुढील काळात सौर ऊर्जा निर्मितीचा वेग प्रचंड वाढेल’ अशी अपेक्षा व आशा उन्मेश जगताप यांनी व्यक्त केली. तसेच ‘इंडियन सोलर हब’ तर्फे संचालित ‘सोलर प्लॅंट’ देखभालीच्या उपक्रमांत दिव्यांग तरुणांना रोजगार उपलब्ध करण्याचा संकल्पही त्यांनी जाहीर केला.
बिपीन शहा यांनी शहा ‘यू एस डिपार्टमेंट ऑफ एनर्जी’ मध्ये संशोधित बिल्डिंगमधील उर्जा वापर कमी करण्यासाठीच्या अनेक तंत्रांबद्दल मार्गदर्शन केले.
‘सौर उर्जा निर्मितीचे प्रमाण जसजसे वाढेल तसतसे त्याच्या निर्मितीचा खर्च कमी होऊन ती सर्व सामान्यांच्या आवाक्यात लवकरच येईल,’ असे लोगेश जनार्दन यांनी सांगितले. .