पुणे ः
‘पुणे शहर विभाग क्रीडा समिती’द्वारा आयोजित वरिष्ठ गट आंतर महाविद्यालय क्रिकेट स्पर्धेमध्ये एमसीई सोसायटी महाविद्यालयाने विजेतेपद पटकाविले.
अलीकडेच झालेल्या सामन्यामध्ये एमसीईएस वरिष्ठ महाविद्यालयाने एमएमसीसी महाविद्यालयाचा 4 गडी राखून पराभव केला. ‘महाराष्ट्र कॉस्मोपोलोटिन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, उपाध्यक्ष आबेदा इनामदार, सचिव लतिफ मगदूम तसेच सर्व कार्यकारिणी सदस्य, आझम स्पोर्टस् अॅकॅडमीचे संचालक गुलजार शेख यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले.
प्रथम फलंदाजी करताना एमएमसीसी महाविद्यालयाने 40 षटकात 9 गडी बाद 223 धावा केल्या. त्यामध्ये पारस गवळी व विनय पाटील यांनी प्रत्येकी 68 धावा केल्या. त्यांना अभिमन्यू याने 41 धावा करून साथ दिली. दानिश पटेल याने 4 गडी बाद केले. त्यास प्रतिउत्तर देताना एमसीईएस वरिष्ठ महाविद्यालयाने 39.5 षटकांमध्ये 6 गडी गमावून 224 धावा करून विजय मिळवला.
विजयी संघाकडून झैद पटेल याने सर्वाधिक 53 धावा केल्या. तर झैद अन्सारी याने 42 आणि दानिश पटेल याने 40 धावा केल्या.

