पुण्यातील पहिल्या अद्ययावत ‘प्रधानमंत्री कौशल केंद्रा’ चे खासदार शिरोळेंनी केले उद्घाटन –
पुणे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी स्किल डेव्हलपमेंट योजनेतील पुण्यातील पहिल्या अद्ययावत ‘प्रधानमंत्री कौशल केंद्र’ चे उद्घाटन खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते झाले.
जहांगीर हॉस्पिटल समोरील ‘सोहराब हॉल’ इमारतीमध्ये ८ हजार चौरस फुट प्रशस्त जागेत हे कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले आहे. ज्युनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर, डोमेस्टिक आय.टी. हेल्प डेस्क अटेंडंट, फिल्ड टेक्नीशियन नेटवर्किंग अॅण्ड स्टोरेज,फिल्ड टेक्नीशियन कॉम्प्युटिंग अॅण्ड पेरिफेरल्स्, सुईग मशीन ऑपरेटर, हेअर स्टायलीस्ट, रिटेल ट्रेनी असोसिएट असे ७ कोर्सस येथे उपलब्ध करण्यात आले आहेत.
पाचवी, दहावी, बारावी उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींसाठी हे ३ ते ४ महिन्यांचे रोजगाराभिमुख कोर्स आहेत. यावेळी आमदार विजय काळे, आमदार मेधा कुलकर्णी, नगरसेवक दिलीप वेडे- पाटील, आदित्य मालवीय उपस्थित होते. प्रधानमंत्री कौशल केंद्र, पुणे चे संचालक सिद्धार्थ रहाळकर, संचालक मनीष सिन्हा यांनी स्वागत केले.
खा. अनिल शिरोळे म्हणाले, ‘देश समृध्द, समर्थ होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्याभिमुख, रोजगाराभिमुख योजना आखल्या, धोरणे ठरवली. ती यशस्वी करण्यासाठी कौशल्ये विकसित करणाऱ्यांची व्यक्तींची गरज आहे. प्रधानमंत्री कौशल केंद्राच्या रुपाने ही गरज पूर्ण होत आहे. उद्योजक घडविण्याची आणि बेरोजगारी कमी करण्याची अपेक्षा आता पूर्ण होईल.’ मनिष सिन्हा यांनी प्रास्ताविक केले, सिध्दार्थ रहाळकर यांनी आभार मानले