‘मिसेस युनिव्हर्स अरब आशिया’साठी पुण्याच्या खुशबू करवा यांची निवड
पुणे –
इच्छा तिथे मार्ग कसा मिळतो याचा आदर्शवत प्रत्यय एका गृहिणीने , दोन मुलींच्या आईने … कॉर्पोरेट क्षेत्रातील एका उद्योजिकेने आणि जलव्यवस्थापन क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल केंद्रसरकारने गौरविलेल्या पुण्यातील खुशबु सम्राट करवा यांनी सौंदर्य स्पर्धेत भाग घेऊन दिला आहे. मिसेस युनिव्हर्स अरब आशिया २०१८ या स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली असून भारताकडून त्या प्रतिनिधित्व करणार आहेत.
इंटिरिअर डिझायनर असलेल्या खुशबू करवा या मेकॉट्रॉनिक्स सिस्टीम या कंपनीत संचालक पदावर कार्यरत आहेत. विविध क्षेत्रात महिलांचा सहजतेने सहभाग असावा या उद्देशाने त्या स्मार्ट डिजिटल इंटिग्रेटेड वॉटर रिसोर्स मॅनेजमेंटमध्येही कार्यरत असून उत्कृष्ट कार्याबद्दल केंद्र सरकारचा तसेच सेंट्रल बोर्ड ऑफ इरिगेशन अँड पॉवर यांचा पुरस्कारही त्यांच्या कंपनीला मिळाला आहे. मिसेस युनिव्हर्स अरब आशिया २०१८ या स्पर्धेत खुशबू करवा यांनी देशातून महाराष्ट्रासाठी प्रतिनिधित्व केले आणि त्यांनी या स्पर्धेत यशही मिळवले. मिसेस युनिव्हर्स अरब आशिया २०१८ या स्पर्धेच्या भारतातील संचालक अंजना मेस्कारन्हेस यांच्या मार्गदर्शनाखाली आता मिसेस युनिव्हर्स अरब आशिया २०१८ साठी त्या भारताकडून प्रतिनिधित्व करणार आहेत.