पुणे, दि. १७ डिसेंबर २०२१: वीजमीटरमध्ये फेरफार करून दोन कारखान्यांमधील १ लाख ५२ हजार ५२३ युनिटची म्हणजे २५ लाख १३ हजार रुपयांची वीजचोरी महावितरणच्या भरारी पथकांनी नुकतीच उघडकीस आणली आहे. वीजचोरीच्या दोन्ही प्रकरणांमध्ये वीजचोरी व दंडाचे एकूण ४४ लाख ५३ हजार रुपयांचे वीजबिल देण्यात आले आहे. तसेच संबंधीतांविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी, की जाधववाडी (ता. हवेली) येथील एच.एस. एंटरप्रायजेस व सलीम प्लास्टीक या दोन्ही औद्योगिक ग्राहकांनी वीजजोडणीसाठी मंजूर केलेल्या जोडभारापेक्षा अधिक वीज वापर केल्याचे तसेच मीटरमध्ये फेरफार केल्याचे आढळून आले. यामध्ये एच.एस. एंटरप्रायजेसमध्ये ९ लाख ५५ हजारांची वीजचोरी निदर्शनास आली. या ग्राहकास वीजचोरी व दंड असे एकूण २१ लाख २५ हजार रुपयांचे वीजबिल देण्यात आले आहे. अशाच प्रकारची १५ लाख ५८ हजार रुपयांची वीजचोरी सलीम प्लास्टीकमध्ये आढळून आली. त्यास वीजचोरी व दंड असे एकूण २३ लाख २८ हजार रुपयांचे वीजबिल देण्यात आले आहे. या दोन्ही वीजचोरी प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा २००३ मधील कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वीजचोरी उघडकीस आणण्यासाठी सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे पुणे परिक्षेत्र उपसंचालक कमांडर शिवाजी इंदलकर यांच्या मार्गदर्शनात भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता नरेंद्र रडे, सहायक सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी नंदकुमार जाधव, वरिष्ठ तंत्रज्ञ दीपक खेडकर आदींनी सहभाग घेतला.

