पुणे-प्रशिक्षण मिळाल्याने कामगारांचे कौशल्य वाढून त्यांचे जीवन समृध्द बनेल असा आशावाद पॉवर ग्रीडच्या आरती गुप्ता यांनी व्यक्त केला.
पॉवर ग्रीड कार्पोरेशनने बांधकाम कामगारांच्यामध्ये व्यवसाय कौशल्य वाढावे या हेतूने त्यांच्या सीएसआर फंडातून बांधकाम कामगारांच्या कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यासाठी वाकड येथे द अॅड्रेस या बांधकाम साईटवर आयोजित केलेल्या शुभारंभाच्या कार्यक्रमात गुप्ता बोलत होत्या.
कामगार आयुक्त राजेंद्र हेंद्रे, कुशलचे जे. पी. श्रॉफ, जितेंद्र भागवानी, अनिल भागवानी, दिलीप भागवानी,कुशलचे सचिव समीर बेलवलकर व्यासपीठावर उपस्थित होते. आरती गुप्ता म्हणाल्या की, बार बेंडींग, वीट बांधकाम, शटरींग या तीन विषयावरील हे प्रशिक्षण कामगारांसाठी पूर्णपणे मोफत असून त्यामुळे कामगारांची गुणवत्ता वाढेल. काम करताना, कामाच्या ठिकाणीच हे प्रशिक्षण मिळणार असल्याने कामगारांना प्रशिक्षणासाठी वेगळा वेळ द्यावा लागणार नाही. या प्रशिक्षणामुळे कामगारांना कायमस्वरुपी रोजगार मिळाला तर ते या प्रशिक्षणाचे यश आहे असे मी मानेल.
जे. पी. श्रॉफ म्हणाले की, कुशल चा या मधील सहभाग आमच्यासाठी खूप अभिमानास्पद बाब आहे.आता पॉवरग्रीड च्या सहयोगाने कुशल कामगारांना त्यांच्या कामामध्ये अधिकाधिक परिपूर्ण बनवू शकेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आमची दारे अशा कॉर्पोरेट मधील लोकांसाठी नेहमीच उघडी आहेत जे आपला सीएसआर चा निधी कामगारांच्या कौशल्य विकासासारख्या लोककल्याणकारी कामासाठी दान करू इच्छीतात, असे मत समीर बेलवलकर यांनी यावेळी मांडले.
कामगार आयुक्त हेंद्रे म्हणाले की, बांधकाम कामगारांनी आपली नोंद केल्यास त्यांना सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळतो. मुलांचे शिक्षण, अपघात वा आजारपणासाठी लागणा-या खर्चावर वीमा संरक्षण मिळते. द अॅड्रेस, एफ रेसीडेन्सी, न्याती सिंबॉयसेस, रोहन अभिलाषा फेज एक व दोन, प्राईड वल्ड सीटी, मार्व्हेल कायरा या सात बांधकाम साईटवर हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
सहभागी कामगारांना आरती गुप्ता यांच्या हस्ते जॉकेट, ओळखपत्र व प्रशिक्षण साहित्य देण्यात आले. नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कार्पोरेशन आणि कुशल क्रेडाई पुणे मेट्रो यांच्या सहकार्यातून हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
सुरेश कुमावत, तुळशीराम राठोड या कामगारांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. तेजस बडवे यांनी स्वागत व सूत्रसंचलन केले.