पुणे : “मोदीजी, पुण्यात येऊन गटारात उतरा अन अध्यात्मिकतेचा आनंद घ्या’, अशा शब्दांत गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आव्हान दिले .
भिमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियानांतर्गत आज पुण्यात शनिवार वाड्यावर झालेल्या ‘एल्गार परिषदे’त मेवानी बोलत होते. यावेळी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, राधिका वेमुला (रोहीत वेमुलाची आई), जेएनयूचा विद्यार्थी उमर खालिद, उल्काताई महाजन, सोनी सोरी, अब्दुल हमिद अजहर आयोजक संतोष शिंदे आणि सहकारी आदी उपस्थितहोते.
मेवाणी म्हणाले की, मोदी हे मुख्यमंत्री असताना त्यांनी “कर्मयोगी’ नावाचे पुस्तक लिहले. जे लोक स्वच्छता करतात, त्यांना अध्यात्मिक आनंद मिळतो, असे त्यांनी पुस्तकात लिहले. खरे हीच तर “न्यू पेशवाई’ आहे. भीमा कोरेगावच्या शहीदांना अभिवादन करत असताना मला मोदींना एक आवाहन करायचे आहे. त्यांनी पुण्यात यावे, गटारात उतरावे आणि घ्यावा अध्यात्मिक आनंद. त्यानंतर देशाला नवी पेशवाई कळेल, असे मेवाणी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना प्रत्येक निवडणुकीपूर्वी अखेरच्या वर्षात राम मंदिर आणि हजच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे गेले. यंदा देखील तीच परंपरा त्यांनी कायम राखली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डोक्यासाठीच सध्या स्वच्छता अभियान राबवण्याची गरज आहे, अशा शब्दांत गुजरातमधील तरुण आमदार जिग्नेश मेवानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कडाडून टीका केली.
मेवानी म्हणाले, यंदाच्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप ने १५० जागा येतील असा अंदाज बांधला होता. मात्र, तो त्यांचा केवळ अंदाजच राहिला असून त्यांना प्रत्यक्षात ९९ जागा मिळाल्या. हे तेथील जनतेने त्यांच्या विरोधात केलेल्या मतदानामुळे शक्य झाले. आता २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला घरी पाठवण्यासाठी सर्वांनी एकत्र आल्यास तेव्हा देखील त्यांना दोन अंकीच जागा मिळतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यासाठी सर्व विरोधकांनी एकाच व्यासपीठावर येण्याची आवश्यकता आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
(पहा आ. मेवानी यांचे पूर्ण भाषण जसेच्या तसे ….)