पुणे- कोंढव्यात एका उच्चभ्रु सोसायटीत चालणाऱ्या एका अवैध क्लबवर अखेर पोलिसांनी रेड मारली आणि येथून पोकर व विदेशी चलनासह विदेशी दारु मोठ्या प्रमाणावर हस्तगत केला आहे. सामाजिक सुरक्षा विभाग, अंमली पदार्थ विरोधी पथक व गुन्हे शाखा यांनी ही कारवाई केली .कोंढव्यात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सर्रास सुरू असल्यामुळे यापुढे देखील हद्दीत मोठ्या कारवाया होणार असल्याबाबत पोलीस सांगत आहेत .
याबाबत अधिक माहिती अशी की, कोंढव्यातील क्लाऊड नाईन सोसायटीतील सैनिक विहार येथील बंगला नं.१६ येथे आरोपी जितेन जगदिप सिंग हा अवैध विदेशी दारु, जुगाराचे साहित्य व परकीय चलने बाळगत असल्याबाबत पुणे पोलिसांना माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारावर सामाजिक सुरक्षा विभाग वरिष्ठ पो.निरीक्षक शिल्पा चव्हाण, पो.नि.विनायक गायकवाड अंमली पदार्थ विरोधी पथक-१ व गुन्हे शाखेकडील अधिकारी यांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता लाखो रुपयांच्या विदेशी दारूच्या बाटल्या, लाखो रुपयांचे पोकर जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जवळपास ४८ लाख रुपये तसेच परकीय चलन ऑस्ट्रेलियन डॉलर व अमेरिकन डॉलर जवळपास ८ लाख रुपये असा एकूण ५८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत कोंढवा पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


