पुणे- लॉक डाऊन मुळे नागरिकांच्या असंख्य मुलभूत हक्कांवर महामारीच्या कारणाने गदा आणावी लागली असून ,या काळात घरात बसून अवघडलेल्या मानवी शरीरांना मॉर्निंग अगर इविनिंग वॉकला सुद्धा बाहेर पडणे शक्य होत नाही .अशाही परिस्थितीत सायंकाळी ‘ वॉक’ला जाणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. सिंहगड रस्ता परिसरातील वडगांव बुद्रुक येथील कॅनॉल शेजारील ट्रॅकवर सायंकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना पोलिसांनी सर्व बाजूंनी घेरा घालून तब्बल १०९ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करीत ५४ हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल केला.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलिस आणि महापालिका प्रशासनाच्यावतीने नागरिकांना वारंवार केले जात आहे. मात्र काहीजण तरीही या आवाहनाकडे दुर्लक्ष करीत सायंकाळी वॉकला घराबाहेर पडतात. अशा व्यक्त्तींविरोधात सिंहगड रस्ता पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.
सध्या पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या थोडी कमी होत आहे. मात्र अत्यवस्थ रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे लॉकडाऊनचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन प्रशासनाकडून वारंवार केलं जात आहे.त्यामुळे सायंकाळी फिरायला जाणाऱ्या पुणेकरांच्या करून दंड वसूल केला. यावेळी पुरुषांशिवाय अनेक महिलाही फिरताना आढळून आल्या. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रतिभा तांदळे, पोलीस उपनिरीक्षक दीपक खेडकर, नितीन जाधव व पोलीस कर्मचाऱ्यांनी पायी चालण्याचा व्यायाम करणाऱ्या व्यक्तींविरोधात कारवाई केली.

