दैनंदिन प्रवाशी संख्येसह दैनंदिन उत्पन्नात वाढ
पुणे-कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दि. २२ मार्च २०२० रोजी शासनाने पहिला लॉकडाऊन घोषित केला. पहिला लॉकडाऊन घोषित केल्यानंतर पीएमपीएमएल बस संचलन अत्यावश्यक सेवा वगळता दि. २ सप्टेंबर २०२० पर्यंत पूर्णपणे बंद होते. निर्बंधांमध्ये थोडी शिथिलता आल्यानंतर दि. ३ सप्टेंबर २०२० पासून पीएमपीएमएलची बससेवा टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आली.
कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर दि. ३ एप्रिल २०२१ ते माहे मे २०२१ या कालावधीत पीएमपीएमएलला पुन्हा बस संचलन पूर्णपणे बंद ठेवावे लागले. दोन्ही लॉकडाऊन नंतर पीएमपीएमएल कडून कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळून बस संचलन सुरु करण्यात आले होते.
पीएमपीएमएलची बससेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे असे वाटत असतानाच ओमिक्रॉनचा संसर्ग वाढू लागल्याने दि. १० जानेवारी २०२२ पासून शासन निर्देशानुसार शाळा, कॉलेज बंद करण्यात आले तसेच निर्बंधही कडक करण्यात आले. त्यामुळे बस संचलनात पुन्हा कपात कपात करावी लागली.
मात्र आता ओमिक्रॉनमुळे घालण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात आल्याने व एकंदरीत जनजीवन पूर्वपदावर येत असल्याने पीएमपीएमएलची वाटचाल पहिल्या लॉकडाऊन पूर्वी असलेल्या दैनंदिन प्रवासी संख्येकडे व दैनंदिन उत्पन्नाकडे होऊ लागलेली आहे. लॉकडाऊन पूर्वी असलेली दैनंदिन प्रवासी संख्या व दैनंदिन उत्पन्न मिळवण्यासाठी पीएमपीएमएल प्रयत्नशील आहे. लॉकडाऊनपूर्वी दि. २४ फेब्रुवारी २०२० रोजी पीएमपीएमएलला १ कोटी ५० लाखापेक्षा जास्त उत्पन्न मिळाले होते. त्यानंतर म्हणजेच जवळपास २ वर्षांनी पीएमपीएमएलची दैनंदिन प्रवाशी संख्या ९ लाखांपर्यंत पोहोचली असून दि. १४ फेब्रुवारी २०२२ रोजी एकूण १५४७ इतक्या बसेस संचलनात होत्या. तसेच या दिवशी महामंडळाला १ कोटी ५० लाख २२ हजार ३२६ रुपये इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे.
प्रवाशांच्या सेवेत असलेल्या रातराणी, पुणे दर्शन व महिलांसाठी खास तेजस्विनी बससेवा या सर्व सेवा पूर्ववत सुरु करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊन नंतर प्रवाशी पीएमपीएमएल बस प्रवासाला प्राधान्य देत असून यामुळे दैनंदिन प्रवाशी संख्येसह दैनंदिन उत्पन्नात वाढ होऊन पीएमपीएमएलची बससेवा पूर्वपदावर येत आहे. पीएमपीएमएलची दैनंदिन प्रवासी संख्या ९ लाखांपर्यंत पोहोचली असून दैनंदिन उत्पन्नाच्या बाबतीत रुपये १ कोटी ५० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. सध्या पीएमपीएमएलच्या दररोज सुमारे १५४० पेक्षा जास्त बसेस मार्गावर संचलनात आहेत. जास्तीत जास्त प्रवाशी नागरिकांनी पीएमपीएमएल च्या बससेवेचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

