पुणे-
पीएमपीएमएल कडून मार्ग क्रमांक १६४ – पुणे स्टेशन ते न्हावरे गाव हा नवीन बस मार्ग दिनांक २५ ऑक्टोबर२०२१ पासून सुरू करण्यात आला. न्हावरे येथे शिरूर-हवेली मतदार संघाचे आमदार श्री. अशोकबापू पवार यांच्या हस्ते न्हावरे येथे या बससेवेचे उदघाटन करण्यात आले. न्हावरे गावचे भूषण असलेले सेवानिवृत्त आय. ए. एस. अधिकारी किशोर निंबाळकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. न्हावरे येथील ग्रामस्थांनी संपूर्ण बस फुलांनी सुंदररीत्या सजवून बसची वाजतगाजत मिरवणूक काढली. ग्रामस्थांनी उत्साहात व जल्लोषात बससेवेचे स्वागत केले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे-पाटील, शिरूर तालुका मार्केट कमिटीचे चेअरमन वसंतराव कोरेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर तालुकाध्यक्ष रविबापू काळे, शिरूर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सागरराजे निंबाळकर, न्हावरे गावच्या सरपंच मा. सौ. अलकाताई शेंडगे, पीएमपीएमएलचे
वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, पास विभाग प्रमुख विक्रम शितोळे, पुणे स्टेशन डेपो मॅनेजर श्री. संजय कुसाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
मार्ग क्र.१६४ – पुणे स्टेशन ते न्हावरे या बससेवेचा मार्ग पुणे स्टेशन, येरवडा, रामवाडी, चंदननगर, सणसवाडी, शिक्रापूर फाटा, तळेगांव ढमढेरे, निमगाव म्हाळुंगे फाटा, होमाचीवाडी, घोलपवाडी, दहिवडी, पारवडी फाटा, उरळगाव फाटा, कोळपेवस्ती, गणेश नर्सरी, कुटे वस्ती चौक, मल्लिकार्जुन कॉलेज, न्हावरे गाव असा आहे.
याप्रसंगी बोलताना आमदार अशोकबापू पवार म्हणाले,”येणारा काळ हा इलेक्ट्रिक वाहनांचा व इथेनॉल वर चालणाऱ्या वाहनांचा आहे. पीएमपीएमएलच्या ताफ्यात ई-बसेस असून लवकरच वाघोली येथे ई-बस डेपो होणार आहे.
किशोर निंबाळकर यांनी या बससेवेसाठी चांगला पाठपुरावा केला. डॉ. राजेंद्र जगताप यांनी
पीएमपीएमएलचे अध्यक्ष म्हणून चांगली कामगिरी केली. विद्यमान अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा हे देखील चांगले काम करत आहेत. न्हावरे व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी ही बससेवा अखंडपणे सुरू राहण्यासाठी बससेवेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे.”
सेवानिवृत्त आय.ए.एस. अधिकारी किशोर निंबाळकर म्हणाले,”न्हावरे गाव हे पंचक्रोशीतील गावांना
जोडणारे प्रमुख गाव असून बाजारपेठेसाठी प्रसिध्द आहे. कोणत्याही गावाचा विकास होण्यासाठी दळणवळण महत्वाचे असते.
पीएमपीएमएलची बस सेवा सुरू झाल्याने न्हावरे गावाचा विकास आणखी वेगाने होईल. ही बससेवा सुरू केल्याबद्दलपीएमपीएमएल चे अध्यक्ष व सर्व संचालकांचे मानावे तेवढे आभार थोडेच आहेत. येणाऱ्या काळात पर्यावरण व वाहतूक ही मोठी समस्या होणार आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर आपण सर्वांनी वाढवला पाहिजे. पीएमपीएमएलच्या बससेवेला चांगला प्रतिसाद देऊन बससेवा निरंतर कशी चालू राहील याची दक्षता आपण सर्व ग्रामस्थांनी घेतली पाहिजे.”
पीएमपीएमएलचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे म्हणाले,”पुणे जिल्ह्याच्या ९ तालुक्यांमध्ये
पीएमपीएमएलची बससेवा सुरू होती. नुकतीच आंबेगाव व बारामती तालुक्यात बससेवा सुरू झाली आहे. पीएमपीएमएलची दैनिक ७० रुपये व मासिक १४०० रुपये तर ज्येष्ठ नागरिकांसाठी दैनिक ४० रुपये व मासिक ५०० रुपयांचा पास अशी पास सुविधा उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांसाठी मासिक ७५० रुपयांचा पास असल्याने पुणे शहरात शिक्षणासाठी ये-जा करणे विद्यार्थ्यांना सोयीचे होणार आहे. सध्या या मार्गावर ३ बसेस सुरू करीत आहोत. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून आणखी बसेस
वाढविल्या जातील.” न्हावरे ग्रामस्थांनी पीएमपीएमएलचे अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक पत्रकार यांचे बससेवा सुरू होण्यासाठी विशेष सहकार्य लाभल्याबद्दल सत्कार करून आभार मानले. घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्राचार्य गोविंदकाकाराजे निंबाळकर यांनी प्रास्ताविक केले. श्री. संभाजी बिडगर यांनी सूत्रसंचालन केले. सुभाष कांडगे यांनी
आभार मानले.

