पुणे – पीएमपीएमएल कडून दि २६/१२/१०२१ पासून मार्ग क्रमांक १७० पुणे स्टेशन ते कोंढवा (शिवनेरीनगर) हा नवीन बस मार्ग सुरू करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य पातळीवरील नेते.गणेश सातपुते, ‘मनसे’ चे प्रवक्ते योगेश खैरे यांच्या हस्ते कोंढवा (शिवनेरीनगर) येथे या बससेवेचे उदघाटन करण्यात आले. पुणे महानगरपालिकेतील मनसेचे गटनेते व विद्यमान नगरसेवक साईनाथ बाबर व त्यांच्या पत्नी आरती बाबर यांनी या बसेवेसाठी पाठपुरावा केला.मार्ग क्रमांक १७० – पुणे स्टेशन ते कोंढवा (शिवनेरीनगर) या बस सेवेचा मार्ग पुणे स्टेशन, पुलगेट, वानवडी, लुल्लानगर, कोंढवा शाळा, कोंढवा (शिवनेरीनगर) असा असणार आहे. सध्या या बसमार्गावर एका बसद्वारे पुणे स्टेशन व कोंढवा (शिवनेरीनगर) येथून दर दीड तासाला बससेवा उपलब्ध असेल. प्रवाशी प्रतिसाद व उत्पन्न वाढल्यास या मार्गावर आणखी बसेस वाढविण्यात येतील. याप्रसंगी बोलताना गणेश सातपुते व योगेश खैरे यांनी कोंढवा (शिवनेरीनगर) परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांची पीएमपीएमएल च्या बससेवेची मागणी नगरसेवक साईनाथ बाबर यांच्या माध्यमातून आज पूर्ण होत असल्याचे सांगितले. तसेच सदरची बससेवा सुरू झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना किफायतशीर दरात प्रवास करता येणार असल्याचेही ते म्हणाले.
नगरसेवक साईनाथ बाबर म्हणाले, “पुणे स्टेशन पासून कोंढवा (शिवनेरीनगर) पर्यंत पीएमपीएमएल ची थेट बस सेवा नव्हती. सदरची बससेवा सुरू झाल्यामुळे या परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच ही बस सेवा सुरू केल्याबद्दल पीएमपीएमएलच्या सर्व अधिकार्यांचे परिसरातील नागरिकांच्या वतीने त्यांनी आभार मानले
याप्रसंगी मनसेच्या पुणे शहर महिला उपाध्यक्षा सुप्रिया शिंदे, मनसेचे हडपसर विधानसभा मतदार
संघाचे विभाग अध्यक्ष अमोल शिरस, मनसेचे शाखाध्यक्ष गणेश बाबर, पुणे स्टेशन डेपो मॅनेजर संजय कुसाळकर, सतिश शिंदे,अशोक सोनवणे सर, ह.भ.प. कुंडलिक रावडे, दादा भणगे, गणेश रावडे, विजय बधे, सचिन कवडे, मारुती गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
अमोल शिरस यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सुप्रिया शिंदे यांनी आभार मानले. पीएमपीएमएलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे यथोचित सत्कार करून सदर बस सेवा सुरु केल्याबद्दल नागरिकांनी आभार मानले.

