विकास कामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवा : खासदार वंदना चव्हाण ; नवनियुक्त पदाधिकार्यांच्या सत्कार, निवडणूक नियोजनावर चर्चा
पुणे :
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापौर प्रशांत जगताप आणि स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांच्या सत्काराचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम पंडीत नेहरू सभागृह, घोले रोड येथे आयोजित करण्यात आला होता.
खासदार, शहराध्यक्ष अॅड. वंदना चव्हाण यांच्या हस्ते पालिकेतील नवनियुक्त पदाधिकार्यांमध्ये महापौर प्रशांत जगताप, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके तसेच माजी स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम, सभागृह नेते बंडू केमसे, शिक्षण मंडळ अध्यक्ष वासंती काकडे यांचा सत्कार करण्यात आला. प्रदेश सरचिटणीस अशोक राठी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी महानगरपालिकेच्या 2017 च्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नगरसेवक, कार्यकर्त्यांनी पुढील काळात कोणत्याप्रकारे काम केेले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. महानगरपालिकेच्या विकास कामांचा आढावा आणि नियोजन याविषयी बोलताना त्यांनी नगरसेवकांनी केलेली कामे जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत कशी पोहोचवावी यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे असेही त्या म्हणाल्या.
सत्काराला उत्तर देताना प्रशांत जगताप म्हणाले, ‘पक्षाच्या वतीने आजचा माझा हा सत्कार घरचा, हक्काचा सत्कार आहे लोकशाही मुल्यांवर स्थापन झालेल्या पक्षात कार्यकर्त्याला ताकद कशी द्यायची हे पक्षाला माहित आहे. पक्षाने मला जी संधी दिली आहे, त्याचा योग्य वापर करून जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करेन. पक्ष संघटन मजबूत असल्यामुळेच मला आज महापौर पद मिळू शकले याचा मला अभिमान आहे.’
स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी देखील मनोगत व्यक्त केले.
या वेळी पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे, सभागृह नेते बंडू केमसे, प्रदेश सरचिटणीस अशोक राठी, बाबुराव चांदेरे, नगरसेवक रर्वीद्र माळवदकर, अश्विनी कदम, भगवान साळूंखे, दादा सांगळे, इक्बाल शेख, आनंद रिठे, वासंती काकडे, रजनी पाचंगे, महिला शहराध्य रूपाली चाकणकर, मनाली भिलारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, शहर पदाधिकारी, विधानसभा अध्यक्ष, ब्लॉग अध्यक्ष, सेल अध्यक्ष आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
माजी मंत्री बापूसाहेब थिटे, माजी युवक शहराध्यक्ष अजित बाबर, पक्षाचे उपाध्यक्ष सुनील खाटपे यांच्या मातोश्री व वडिल यांना दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली.