पुणे- गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळक कि भाऊसाहेब रंगारी हा वाद यंदा महापालिकेने आयोजित केलेल्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उफाळून आला आहे . महापौर मुक्ता टिळक यांनी लोकमान्य हेच गणेश उत्सवाचे जनक असल्याची ठाम भूमिका ठेवली होती तर कॉंग्रेस राष्ट्रवादीने मात्र लोकमान्य टिळक हे उत्सवाचे प्रसारक आणि भाऊसाहेब रंगारी हेच जनक अशी भूमिका घेतली आहे. महापालिकेच्या महोत्सवामुळे या संदर्भात लावल्या जाणाऱ्या फलकांवर अथवा जाहिरातींवर छत्रपती शिवाजी महाराज , प्रसारक म्हणून लोकमान्य आणि भाऊसाहेब रंगारींचा जनक म्हणून फोटो असावा , आणि यंदाचे वर्ष १२५ वे नसून १२६ वे आहे असे जाहीर असावे अशी मागणी भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट कडून करण्यात आली होती . गणेश उत्सवाचा विषय संवेदनशील असल्याने अनेकांनी याबाबत संयमी भूमिका घेतली. मात्र १० ऑगस्ट रोजी च्या पत्रकार परिषदेत महापौर मुक्ता टिळक यांनी … आम्ही कोणाचेच फोटो लावणार नाही अशी भूमिका स्पष्ट केल्याने यावर पुन्हा लोकमान्यांचा हि फोटो नसेल काय ? याबाबत खल सुरु झाला होता. दरम्यान हे वृत्त अंतिम टप्प्यात येत असताना रात्री उशिरा हाती आलेल्या वृत्ता नुसार महापौरांनी लोकमान्यांचा फोटो असेल असे काही माध्यमांना सांगितल्याचे समजले आहे.
गणेश उत्सवात दरवर्षीप्रमाणे यंदाही पुणे फेस्टिव्हल चे आयोजन सुरु असल्याच्या बातम्या आहेत . जो पुणे फेस्टिव्हल तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी यांनी सुरु केला होता .आता महापालिकेत भाजपा सत्तेवर आल्यानंतर पहिल्याच वर्षी गणेश उत्सवाचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून त्याचे उद्घाटन १२ ऑगस्टला सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे . या पार्श्वभूमीवर महापालिकेचा उत्सव ५००० ढोलचे वादन, भाऊसाहेब रंगारींचा फोटो, साऊंड व्यावसायिकांचे आंदोलन अशा वादात सापडला आहे . या शिवाय भाऊसाहेब रंगारींचा इतिहास दडपला जातोय काय ? असाही प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे ..