पुणे-‘गेली 8 वर्षे बंद असलेले कै बिंदुमाधव ठाकरे रुग्णालय अद्ययावत सुविधांसह सुरू झालेच पाहिजे’ या मागणीसाठी कोथरुडमधील नागरिकांनी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज पुणे महानगरपालिकेसमोर निदर्शने केली आणि 800 कुटुंबियांच्या सह्यांचे निवेदन आरोग्य विभागप्रमुख डॉ रामचंद्र हंकारे यांना दिले. आरोग्यप्रमुखांशी आज महापालिकेत आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते व गोसावी वस्तीतील नागरीकांची मिटिंग झाली. या मिटिंगला या प्रभागातील सर्व नगरसेवक उपस्थित राहणे अपेक्षित असताना देखील उपस्थित राहिले नाहीत तसेच आरोग्यप्रमुखांनी यावर पुर्णपणे हतबलता दर्शवत हा विषय महापालिकेच्या आयुक्तांकडे वळवला आहे. आयुक्तांशी आजच चर्चा करुन यावर निर्णय घेण्यात यावा यासाठी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते व गोसावी वस्तीतील नागरीक आग्रही होते. बैठकीत कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने आणि आरोग्य विभाग प्रमुखांनी हतबलता व्यक्त केल्यामुळे नागरिकांनी महापालिका, नगरसेवक यांच्या निषेधाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. हे आंदोलन येत्या काळात तीव्र करण्याचा निर्धार लोकांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी गोसावी वस्तीतील सुधा सुर्वे म्हणाल्या की, “कोथरूडमधील गोसावी वस्ती शेजारील कै बिंदूमाधव बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाचे उद्घाटन 2011 साली होऊनसुद्धा हे सहा मजली रुग्णालय गेले आठ वर्ष बंद अवस्थेमध्ये आहे. तेथे केवळ पहिल्या मजल्यावर फक्त ओपीडी सुरू करण्यात आली आहे आणि त्याद्वारे काही प्राथमिक उपचार देण्यात येतात. परंतु बाकी पाच मजले आजतागायत बंद आहेत. तेथे कोणत्याही पद्धतीने रुग्णाला भरती अथवा ऍडमिट करण्याची सोय नाही. प्रसूतीची किंवा कोणतीही शस्त्रक्रिया करण्याची सोय नाही. इतकंच काय तर साधं सलाईन लावून उपचार देण्याची सुद्धा सोय नाही. त्यामुळे गोसावी वस्ती, लक्ष्मी वस्ती, कर्वेनगर येथील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. लोकांना नाईलाजास्तव खाजगी हॉस्पिटलमध्ये जावे लागते आणि त्यामुळे बिलाचा मोठा बोजा पडतो.”
“या परिसरातील सामान्य कुटुंबीयांचे अक्षरशः लाखो रुपये हे उपचारांसाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये खर्च पडत आहे. त्याची बिले भरण्यासाठी लोकांना कर्ज काढावे लागत आहे, दागिने गहाण ठेवावे लागत आहेत. जर हे रुग्णालय सुरू झाले तर नागरिकांची खूप मोठी सोय होणार आहे.” असे मत सिकंदर भोंड यांनी मांडले.
अमीना नदिवाले यांनी “माझा मुलगा तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला. त्याच्या हाडांचे फ्रॅक्चर झाले पण त्यांच्या शेजारी सरकारी हॉस्पिटल असून सुद्धा त्यांना आपल्या मुलाला वाचवण्यासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले व त्याला व्यवस्थित करण्यासाठी त्यांना अक्षरशः त्यांचा संसार सर्व विकावा लागला” अशी मार्मिक प्रतिक्रिया त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केली.
“आरोग्यसेवा पुरवणे ही पुणे महानगरपालिकेची महानगरपालिकेची जबाबदारी आहे. ती जबाबदारी त्यांनी कोणतीही सबब, कारण न देता पूर्ण करणे गरजेचे आहे. या ठिकाणी सर्व इमारतींमध्ये खाजगी तत्वावर कर्णबधिर बालकांसाठी केंद्र सुरू करणार आहेत. पण गोसावी वस्ती, कर्वेनगर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना अनेक वर्ष दाखवलेल्या रुग्णालयाच्या स्वप्नाचे काय झाले ? रुग्णालय सेवा सुरू करायच्या नव्हत्या तर ठाकरे रुग्णालयाचा बोर्ड गेली 8 वर्षे का लावला? मोहल्ला सभा अथवा वॉर्ड सभा घेऊन लोकांना रुग्णालय हवे की नको हे विचारले का ?” असे प्रश्न विष्णू साळवे यांनी मांडले.
“कर्णबधिर बालकांसाठी पुनर्वसन केंद्रला विरोध नाही पण रुग्णालय सुरू न करता रुग्णालयाचे तब्बल चार ते पाच मजले पुनर्वसन केंद्राला देणे म्हणजे रुग्णालयाचे स्वप्न गुंडाळून ठेवून गोसावी वस्ती, कर्वेनगर परिसरात राहणाऱ्या नागरिकांचा हा विश्वासघात आहे. लोकांना काय हवे आहे हे विचारण्याची साधी तसदी सुद्धा महापालिकेने घेतलेली नाही!” असे जायदा सय्यद यांनी व्यक्त केले.
सर्व आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांची आणि गोसावी वस्ती, लक्ष्मी नगर, कर्वेनगर येथील नागरिकांची मागणी आहे की, कोथरूडमधील गोसावी वस्ती येथील बिंदूमाधव बाळासाहेब ठाकरे रुग्णालय या बंद असलेल्या सरकारी रुग्णालयाच्या इमारतीमध्ये अत्याधुनिक बहुचार रुग्णालय तातडीने सुरू करण्यात यावे. या इमारतीत किमान चार ते पाच मजल्यांवर रुग्णांना भरती करून त्यांच्यावर उपचार, प्रसूती, शस्त्रक्रिया इत्यादी करण्याची सोय उपलब्ध करावी. तसेच कर्णबधिर बालकांसाठीचे पुनर्वसन केंद्र पुणे मनपाच्या इतर इमारतींमध्ये स्थलांतरित करण्यात यावे आणि ठाकरे रुग्णालयाच्या इमारतीमध्ये अद्ययावत सुविधांसह बहुआयामी रुग्णालय तातडीने सुरू करून आम्हां कोथरूड वासियांना गेल्या आठ वर्षापासून दाखवलेल्या रुग्णालयाच्या स्वप्नाची पूर्तता करावी.
यावेळी आम आदमी पक्षाचे डॉ अभिजीत मोरे, शहराध्यक्ष मुकुंद किर्दत, महाराष्ट्र वाहतूक विंग अध्यक्ष श्रीकांत आचार्य, सुहास पवार, अमोल बगाडे, आनंद पटवर्धन, अभिजीत परदेशी, नितीन बर्वे, राजेंद्र वराडे, निखिल देवकर, संदीप सोनवणे, किशोर मुजुमदार, सुभाष कारंडे, पैगंबर शेख यांच्यासहित अनेक कार्यकर्ते उपस्थित होते