पुणे- शहरातील साडेसहा टीएमसी पाणीकपात करण्याच्या जलसंपदा विभागाच्या आदेशाचा शिवसेनेकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना गटनेते संजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली हंडा आणि घंटानाद आंदोलन करण्यात आले. महापालिकेत मोठ्या संख्येने हंडा घेऊन महिला सहभागी झाल्या होत्या.
यावेळी गटनेते संजय भोसले म्हणाले की, राज्य शासनाने पुणे महापालिकेला २०२१ पर्यंत वार्षिक ११.५० टीएमसी पाणी मंजूर केले आहे. आता महापालिका हद्दीमध्ये ११ गावांचा समावेश झाल्याने पाण्याची मागणी आणखी वाढली आहे. सरकार आणि प्रशासनाने पाणी कपात केल्यास शिवसेना तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा त्यांनी दिला.
शहराला अतिरिक्त पाणीपुरवठा होत असल्याने जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागाला आणि शेतीला पाणी मिळत नसल्याचे सांगून वार्षिक १६ टीएमसी पाणी वापरणाऱ्या पुणे महापालिकेच्या पाणीवाटपात तब्बल साडेसहा टीएमसीने कपात करण्याचे आदेश जलसंपदा विभागाने दिले आहेत. त्यानुसार शहराला वार्षिक ८.९९ टीएमसी पाणी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच आदेशाची अंमलबजावणी न केल्यास दंडाची आकारणी करण्याचा इशाराही जलसंपदा विभागाने पालिकेला दिला आहे.