पुणे-हडपसर येथील कचरा प्रकल्पाच्या विरोधाकडे लक्ष वेधण्यासाठी पुणे महापालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक योगेश ससाणे यांनी भोंगा वाजवून आपला निषेध नोंदवला.यावेळी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले आणि राजेंद्र शिळीमकर यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली .
पुणे महापालिकेच्या हद्दीतील हडपसर येथील रामटेकडी येथी नव्याने उभारण्यात येणाऱ्या 700 टनाचा मिश्र कचरा प्रक्रिया प्रकल्पाला राष्ट्रवादी काँग्रेसने कचरा गाड्या अडवणे, घंटानाद आंदोलन करणे यामधून या प्रकल्पाला जोरदार विरोध केला आहे. या विरोधाकडे लक्ष वेधण्यासाठी पुणे महापालिकेच्या आज , झालेल्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी कॉग्रेसचे नगरसेवक योगेश ससाणे यांनी भोंगा वाजवून प्रशासनाचा निषेध नोंदवला.
मात्र सभागृहात अशा प्रकारे भोंगा वाजवणे म्हणजे सभागृहाचा अवमान असल्याचे सांगत ससाणे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजप सभासदांनी केली. महापौरांनी पालिकेच्या शिपायांमार्फत तो भोंगा जप्त केला. मात्र या प्रकारामुळे काही काळ सभेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर कॉग्रेस गटनेते अरविंद शिंदे आणि विरोधीपक्ष नेते चेतन तुपे यांना मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली.