गांधी जयंती पासून स्वच्छता स्पर्धा -विजेत्यांना स्वच्छता पुरस्काराने सन्मानित करणार -महापौर
पुणे-स्वच्छ भारत अभियान आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी स्वच्छता हीच सेवा या अभियाना अंतर्गत पुणे महापालिका शहरातील नागरिकांसाठी तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी स्वछता स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना पालिकेतर्फे स्वछता पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी पत्रकार परिषदे मध्ये सांगितले.
महापालिकेतर्फे नियोजित करण्यात आलेली ही स्पर्धा 2 ऑकटोबर ते 26 जानेवारी दरम्यान होणार आहे. या मध्ये कुटुंब, गृहनिर्माण संस्था, शाळा/ महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, सार्वजनिक संस्था, खाजगी संस्था व पुणे महापालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी सहभागी होऊ शकतील
महापालिकेच्या संकेतस्थळावर जाऊन प्रवेशिका दाखल करता येणार आहे. या स्पर्धेत 15 क्षेत्रीय कार्यालयातील स्वछतेच्या संबंधित सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या स्पर्धेत भाग घेणे अनिवार्य असणार आहे. या स्पर्धेचे मूल्यांकन 2 ऑक्टोबर पूर्वीची परिस्थिती आणि त्या नंतरच्या परिस्थिती यांच्या विश्लेषणातून त्रयस्थ संस्थेमार्फत करण्यात येणार आहे.
प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर निश्चित करण्यात अली असून 20 जानेवारीला विजेत्याची घोषणा करण्यात येणार आहे. 26 जानेवारी नंतर पुरस्कार वितरण करण्यात येणार असल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले.