पुणे -शहरात सुमारे ९७ टक्के भागात महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी शिथिल केलेल्या लॉकडाऊनला महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विरोध केला असून, त्यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे.
पहा,वाचा,नेमके या संदर्भात महापौर मोहोळ यांनी काय म्हटले आहे …..
अत्यावश्यक सेवेसह लेनमधील पाच दुकाने स.१० ते सा.६ पर्यंत खुली ठेवण्याच्या निर्णयाला विरोध !
पुण्यात आजपासून अत्यावश्यक सेवेसह लेनमधील पाच दुकाने स.१० ते सा.६ पर्यंत खुली ठेवण्याचा निर्णय घेतला गेलाय. याला माझा विरोध आहे. पुणेकरांनी पहिले दोन लॉकडाऊन व्यवस्थित पाळले असताना आणि रुग्णसंख्या आटोक्यात येण्याची शक्यता असताना नवे आदेश शहराला परवडणारे नाहीत,अशी माझी भूमिका आहे.
आज सकाळपासून पुण्यातील सर्वच रस्त्यांवर असणारी गर्दी चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवा, त्याही स. १० ते दु. २ या वेळेत संपूर्ण शहरात असाव्यात, अशी माझी मागणी आहे. शिवाय नव्या आदेशानुसार १० ते ६ वेळ असल्याने लोक दिवसभरही बाहेर असू शकतील. यावर नियंत्रण कसे आणणार?
पुण्यात संवेदनशील परिस्थिती असताना लॉकडाऊन शिथिल करायचा असेल तर त्याबाबत पूर्णपणे अंमलबजावणी करुन निर्णय घेणे आवश्यक आहे. नव्या आदेशामुळे पोलिसांवर मोठा ताण येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकाच लेन/रस्त्यावर अत्यावश्यक व्यतिरिक्त इतर पाच दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली गेली आहे. मात्र ही पाच दुकाने निवडण्याचे निकष काय? यावरून वाद होण्याची शक्यता नाही का? किंवा ५ व्यतिरिक्त इतर दुकान चालकांवर अन्याय झाल्याची भावना का होणार नाही?
कोरोनासंदर्भात लढा देताना गेली दीड महिना मी स्वतः प्रत्यक्ष फिल्डवर आहे. त्यामुळे संक्रमणाच्या या टप्प्यावर इतका वाढीव वेळ आणि सवलती देणे पुणेकरांना परवडणारे नाही. किंबहुना मोठ्या धोक्याला हे निमंत्रण देण्यासारखे आहे, असे माझे मत आहे.
केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेऊन त्याची वेळ सकाळी १० ते दुपारी २ इतकी असावी, ही माझी मागणी सर्व प्रशासनाने गांभीर्याने घेऊन त्यावर तातडीने अंमलबजावणी करावी, ही समस्त पुणेकरांच्या वतीने विनंती !
आपल्या मागणीसंदर्भात पालकमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्याशीही माझे बोलणे झाले असून त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आपण अपेक्षा करूयात ते या प्रकरणी हस्तक्षेप करुन तातडीनं निर्णय घेतील.
नजीकच्या काळात आपल्याला कोरोनासोबतच जगायचं आहे, व्यवसाय सुरु करायचे आहेत, हे मीही मान्य करतो. पण याचा अर्थ असा नाही की अत्यंत घाईघाईने निर्णय घ्यायचा आणि सव्वा महिना प्रभावीपणे राबवलेल्या लॉकडाऊनवर पाणी फिरवायचं?

