पुणे- महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपचे हेमंत रासने यांची शुक्रवारी बहुमताने निवड करण्यात आली. हेमंत रासने यांना भाजपचे सर्व 10 तर पठारे यांना महाविकास आघाडीची 6 मते मिळाली .राष्ट्रवादी- काँग्रेस- शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार महेंद्र पठारे यांचा रासने यांनी ४ मतांनी पराभव केला.
‘पीएमपीएल’च्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहले. स्थायी समितीत एकूण 16 सदस्य आहेत. त्यामध्ये भाजपचे 10, राष्ट्रवादी 4 तर, शिवसेना आणि काँगेसचा प्रत्येकी 1 सदस्य आहे. त्यामुळे हेमंत रासने यांचा विजय निश्चित होता. सन 2020 – 21 चे तब्बल 7 हजार 390 कोटींचे अंदाजपत्रक रासने यांनी नुकतेच सादर केले.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्याला एकमताने मंजुरीही देण्यात आली. तसेच, 2021- 22 चे ही अंदाजपत्रक सदर करण्याची संधी हेमंत रासने यांनाच मिळणार आहे. स्थायी समिती अध्यक्ष झाल्यानंतर हेमंत रासने यांनी आपला उत्पन्न वाढविण्यावर भर असणार असल्याचे सांगितले.
यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते धीरज घाटे, विरोधी पक्षनेते दीपाली धुमाळ, खासदार गिरीश बापट, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक, नगरसचिव सुनील पारखी, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्वीकृत नगरसेवक गणेश बिडकर उपस्थित होते. स्थायी समिती अध्यक्षपदाचा अर्ज माघारी घेण्यासाठी 15 मिनिटांचा कालावधी देण्यात आला.
सुरुवातीला महेंद्र पठारे यांच्यासाठी मतदान घेण्यात आले. त्यांना राष्ट्रवादी – काँग्रेस – शिवसेना महाविकास आघाडीची 6 मते पडली. तर, भाजपच्या हेमंत रासने यांना 10 मते पडली. त्यामुळे हेमंत रासने स्थायी समिती अध्यक्षपदी हेमंत रासने बहुमतांनी निवडून आल्याचे नयना गुंडे यांनी जाहीर केले. त्यांनतर टाळ्या वाजवून, भारतीय जनता पक्षाचा विजय म्हणत आनंद व्यक्त करण्यात आला.
बजेट सादर केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करणारे हेमंत रासने हे पहिलेच अध्यक्ष आहेत. ही निवडणूक पाहण्यासाठी भाजपच्या नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. रासने यांची अध्यक्षपदी निवडणूक होण्यापूर्वी महापालिकेच्या बाहेर ढोल वाजविण्यास सुरुवात झाली होती.
केंद्रात भाजपचे सरकार आहे. तर, राज्यात शिवसेना – राष्ट्रवादी – काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार आहे.
या काळात विकासकामे करताना खासदार गिरीश बापट, राज्यसभेचे खासदार संजय काकडे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून पुणे शहराचा विकास करणार असल्याचेही हेमंत रासने म्हणाले.

