पुणे-शहरातील एका बड्या बांधकाम व्यावसायिकावर महापालिकेची मेहरनजर झाली असून, या व्यावसायिकाच्या ‘आयटी’ कंपन्यांचे ४६ कोटी ६१ लाख रुपयांचे बांधकाम शुल्क कमी करण्यात आले आहे. हा प्रकार लेखा परीक्षण विभागाच्या लक्षात आल्यावर या व्यावसायिकाला मदत करण्यासाठी काही नगरसेवकांनी धाव घेतली असून, ‘ऑडिट समिती’त या शुल्कात सवलत देण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या व्यावसायिकाचा मिळकत कर कमी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबरोबरच या कराची वसुली तत्काळ करण्याची मागणी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी केली आहे. बालेवाडी सर्व्हे नंबर २०, बाणेर सर्व्हे नंबर १०९ (पा), ११४ (पा) आणि खराडी येथील ‘आयटी’ कंपन्यांचे सुमारे ४६ कोटी ६१ लाख रुपयांचे बांधकाम शुल्क कमी करण्यात आल्याचा ठपका लेखा परीक्षण विभागाने ठेवला आहे. यात खराडी येथील कंपनीचे १२ कोटी २४ लाख रुपये बांधकाम विकास शुल्कापोटी, तर चार कोटी ७५ लाख रुपये आयटी प्रीमियमपोटी वसूल करावेत, अशी सूचना लेखा परीक्षण विभागाने स्थायी समितीला सादर केलेल्या अहवालात दिली आहे. बालेवाडी आणि बाणेर येथील कंपनीचे तब्बल २९ कोटी ६२ लाख रुपये वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यात सर्वाधिक रक्कम ही जीना, पॅसेज, लॉबी, लिफ्ट, लिफ्ट मशिन रुम प्रीमियमपोटी सर्वाधिक २२ कोटी १४ लाख वसूल करणे अपेक्षित आहे. याबरोबरच नकाशा तपासणी फी, जमीन विकास शुल्क, बांधकाम विकास शुल्क, पँट्री प्रीमियम, एएचयू प्रीमियम, टॉयलेट प्रीमियम, राडारोडा चार्जेस, वॉटर लाइन डेव्हलपमेंट चार्जेस, कामगार कल्याण निधी उपकर आणि स्थानिक संस्था करापोटी उर्वरित रक्कम वसूल करण्याची सूचना लेखा परीक्षण विभागाचे प्रमुख अंबरीश गालिंदे यांनी केली आहे.अशीमाहिती बराटे यांनी दिली .
बांधकाम व्यावसायिकावर महापालिकेची मेहरनजर-विरोधी पक्षनेते बराटेंचा आरोप
Date:

