पुणे: नियंत्रणाबाहेर गेलेल्या वाहतुकीसाठी शाश्वत पर्याय ठरणाऱ्या ‘हाय कॅपेसिटी मास्ट ट्रांझिस्ट रूटच्या अंमलबजावणीसाठी [रिंगरोड ] ५ हजार १९२ कोटी रुपयांची निविदा निघाल्याने या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा मार्ग आता सुकर झाला आहे. आता भूमिपूजन होऊन या प्रकल्पाला खऱ्या अर्थाने चालना मिळणार आहे. गेले बारा वर्षे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून जीवघेण्या वाहतुकीबरोबरच वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका होणार आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हा उच्च क्षमता वर्तुळाकार मार्ग [ रिंग रोड ] महत्वपूर्ण ठरणार आहे,अशी प्रतिक्रिया या रिंग रोडसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी आबा बागुल यांनी दिली.
यासंदर्भांत माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले कि, शहरातील रस्त्यावरचा वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी व भविष्यातील रहदारीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार्या ‘हाय कॅपेसिटी मास्ट ट्रांझिस्ट रूट’साठी ५हजार १९२ कोटींची निविदा प्रक्रिया झाल्याने या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा मार्ग सुकर झाला आहे. एकूण ३६.६ किलोमीटर लांबीचा असणारा हा रस्ता संपूर्ण इलेव्हेटेड असणार आहे. रुंदी २४ मीटरची असणार आहे. या मार्गावर ६ मार्गिका (लेन्स) असणार आहेत. त्यापैकी २ बीआरटीसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. विशेषत: राष्ट्रीय महामार्गांना हा रस्ता जोडला जाणार आहे. इलेव्हेटेड असणाऱ्या या मार्गावर बीआरटीसाठी २८ स्थानके असणार असून त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्या आणि यांत्रिक जिने (एलेव्हेटर्स) यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आगामी ४० वर्षात वाहतुकीत होणाऱ्या वाढीचे प्रमाण लक्षात घेऊन या मार्गाचे नियोजन करण्यात आले आहे. या मार्गावर वाहनांची वेगमर्यादा ५० किलोमीटर प्रति तास एवढी निश्चित करण्यात आली आहे. सन २०४० पर्यंत वाहतुकीची स्थिती लक्षात घेऊन या रस्त्याचे नियोजन होणार आहे. या मार्गासाठी ७२ हजार ३४६. ८१६ चौरस मीटर क्षेत्र अधिग्रहित करण्यात आले आहे.
माजी उपमहापौर आबा बागुल पुढे म्हणाले कि, १९८७ च्या आराखड्यात काँग्रेसने भविष्यातील वाहुकीचा विचार करून या नियोजित प्रकल्पासाठी आखणी केली. मात्र प्रशासकीय दिरंगाई आणि दुर्लक्षामुळे हा प्रकल्प रखडला. त्यामुळे २००७ मध्ये पालिकेत विरोधीनेता पदाच्या माध्यमातून हा उच्च क्षमता वर्तुळाकार मार्ग मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. तेंव्हापासून सलग १२ वर्षे पुणे महानगरपालिका , राज्यसरकार व केंद्रसरकारकडे शेकडो पत्रे , निवेदने , प्रत्यक्ष भेटीद्वारे पाठपुरावा करीत आलो. या प्रकल्पासाठी वनविभाग व केंद्रसरकारच्या तसेच काही खासगी जमिनींचे भूसंपादन पाहता दिरंगाई निर्माण झाली . त्यामुळे त्या- त्या विभागांकडे पाठपुरावा करीत राहिलो. गांधीगिरीच्या माध्यमातून रोज एक पत्र आणि गुलाबाचे फुल देऊन या प्रकल्पाला चालना देण्यासाठी कटिबद्ध राहताना या प्रकल्पाचे भूसंपादन, संपूर्ण आराखडा, सल्लागार नियुक्तीसह आर्थिक तरतूदसाठी विविध पर्याय सुचवून हा प्रकल्प मार्गी लावला, असेही आबा बागुल यांनी स्पष्ट केले. काँग्रेस पक्षातर्फे गेले बारा वर्षे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून जीवघेण्या वाहतुकीबरोबरच वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका होणार आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हा उच्च क्षमता वर्तुळाकार मार्ग [ रिंग रोड ] महत्वपूर्ण ठरणार आहे. मुख्यमंत्र्यांनी येत्या जूनमध्ये या प्रकल्पाचे भूमिपूजन निश्चित केल्याने आणि आता या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी ५ हजार १९२ कोटींचे ग्लोबल टेंडर निघाल्याने खऱ्या अर्थाने भूमिपूजनाचा मार्ग सुकर झाला असून प्रकल्पाला चालना मिळणार आहे.

