पुणे-महापालिका हद्दीत तब्बल १ हजार ६५७ मोबाइल टॉवर्स अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे महापालिकेचे उत्पन्न बुडत आहे. विविध मोबाइल कंपन्यांचे केवळ २३८ अधिकृत टॉवर्स आहेत. शिवसेनेचे नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या प्रश्नोत्तरात विविध प्रश्न उपस्थित करून माहिती उघडकीस आणली आहे..
महापालिकेच्या हद्दीत विविध मोबाइल कंपन्यांचे इमारतींवर, छतांवर अनधिकृत टॉवरचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे महापालिकेचे उत्पन्नही बुडत आहे. अधिकृत मोबाइल टॉवरला परवानगी देण्यासाठी स्क्रुटिनी फी ६०० रुपये, एकरकमी प्रशासकीय शुल्क ३० हजार रुपये, बांधकाम विकसन शुल्क इमारतीवरील मोबाइल टॉवर बांधकामांसाठी शीघ्रसिद्धगणक दराच्या ४० टक्क्यांपैकी ८ टक्क्यानुसार आकारले जाते. मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर असल्यास ८ टक्केपैकी जागेचा शीघ्रसिद्धगणक दरानुसार आकारले जाते. .
महापालिकेला मोबाइल टॉवरच्या माध्यमातून ७ कोटी २४ लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. मोबाइल टॉवरच्या माध्यमातून मिळकतकराच्या माध्यमातून ३१ कोटी ३६ लाखांचे उत्पन्न मिळाले. दरम्यान, जुना बाजार येथे पडलेल्या होर्डिंगच्या दुर्घटनेनंतर महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांकडून नोव्हेंबर अखेरपर्यंत १९२ बेकायदेशीर होर्डिंग पाडण्यात आली आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. .

