पुणे- ग्रेड पे च्या प्रश्नाने होणाऱ्या वेतनकपाती च्या समस्येने पुणे महापालिकेचे कर्मचारी मेटाकुटीला आले असून कायमची डोक्यावर असलेली वेतन कपातीची तलवार बाजूला करणारा कोणताही उपाय अद्याप न सापडल्याने यापुढे संपाचे हत्यार उपसण्या शिवाय गत्यंतर उरलेले नाही असा पवित्रा कर्मचारी संघटना घेण्याच्या मार्गावर दिसत आहेत . कालच काही कर्मचाऱ्यांच्या झालेल्या वेतन कपातीच्या आदेशामुळे आज पुन्हा सुमारे ५०० कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या हिरवळीवर निदर्शने करत निषेध नोंदविला आणि महापालिकेतील सभागृहनेते श्रीनाथ भिमाले ,स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांच्यापुढे पुन्हा आपले गाऱ्हाणे मांडले .आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचे आश्वासन मिळविले.
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना शासनाच्या ग्रेड पे नुसारच वेतन द्यावे या राज्य शासनाच्या एका जुन्या आदेशाचा आधार घेत अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त यांनी प्रमोशन देताना कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात सुरु केली आहे . एकीकडे अनधिकृत पणे काम करणारे कर्मचारी, मोठ्या संख्येने असलेल्या रिक्त जागा आणि त्यात आता मुख्य सभेचे निर्णय झुगारून अधिकृत कर्मचाऱ्यांची या पद्धतीने होणारी वेतन कपात या त्रांगड्यात पालिकेची बजबजपुरी होते आहे . प्रशासनाने मुख्य सभेचे याबाबतचे निर्णय डावलल्यानंतर कर्मचाऱ्यांनी गेल्या महिन्यात महापालिकेसमोर मोठे आंदोलन केले होते .आणि पदाधिकाऱ्यांच्या समवेत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या समोर देखील हा मुद्दा मांडला होता . त्यानंतर वेतन कपातीचे प्रशासनाचे धोरण स्थगित होईल असे कर्मचाऱ्यांना वाटले .पण प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही बदल झाला नसल्याचे कालच्या एका आदेशान्वये स्पष्ट झाले . एवढेच नव्हे तर आता यापुढे सरसकट सर्व कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर शासनाचा ग्रेड पे लागू करून वेतनकपातीची तलवार तळपू लागली आहे . भाजप सत्ताधारी त्यांची जाहीर साथ असताना १८ हजार कर्मचारी या असणातोशाने धुमसताना दिसत आहेत . या पार्श्वभूमीवर वेतन कपातीची हि तलवार आता कायमची बाजूला करण्यासाठी संपाचे हत्यार उपसावे काय ? अशा प्रश्नांवर कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा झडू लागली आहे . यावर जाहीर पणे अधिकृतपणे कोणतीही भूमिका कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केली नसली तरी उग्र आंदोलनाचा मात्र इशारा दिला आहे . सत्ताधारी विविध पण छुप्या मार्गाने या असंतोषाचे बळी ठरत आहेत . विरोधी पक्षांनी याबाबत घेतलेली ‘देखते रहो ‘ ची भूमिका आणि कर्मचाऱ्यांच्या लटकत्या समस्या यामुळे पालिकेचे प्रशासन देखील डबघाईला येणार आहे हे निश्चित .
या पार्श्वभूमीवर महापालिका कर्मचारी संघटनेचे एक प्रतिनिधी बापू पवार यांची माय मराठी ने घेतलेली हि मुलाखत ……
ग्रेडपे -वेतन कपातीने पालिका कर्मचारी मेटाकुटीला-(व्हिडीओ)
Date:

