पुणे-माता रमाई आंबेडकर या डॉ.बाबासाहेब आंबेडकर नावाच्या इमारतीचा पाया होत्या. बाबासाहेबांच्या कार्यात अडथळा होऊ नये यासाठी रमाईंनी त्यांना आयुष्याच्या अखेरपर्यंत साथ दिली. डॉ.आंबेडकर यांच्या आयुष्यात त्यांचे योगदान खूप मोठे आहे. माता रमाई यांचे जीवन प्रत्येक भारतीय महिलेसाठी प्रेरणादायी असल्याचे मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले.
पुण्यात आज (बुधवार) माता रमाई आंबेंडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी.विद्यासागर राव, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री गिरीश बापट, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार अनिल शिरोळे, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, आदी उपस्थित होते.
राष्ट्रपती कोविंद पुढे म्हणाले, “रमाई यांच्या व्यक्तिमत्वाची उंची खूप मोठी आहे. ज्यावेळी कठीण परिस्थितीत बाबासाहेबांना कोणी साथ देत नव्हते, त्यावेळी रमाई यांनी त्यांची साथ सोडली नाही. त्यांनी बाबासाहेबांसोबत राहून त्यांच्या कार्यात त्यांना प्रोत्साहित केले. बाबासाहेबांच्या महान व्यक्तिमत्वाचा आदर संपूर्ण जगात केला जातो. त्यांना विश्वव्याख्यात करण्यात रमाईंचे मोठे योगदान आहे. महिलांना समान हक्क मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी कायमच प्रयत्न केले आहेत. याचेच प्रतिबिंब बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानात उमटले आहे”


