पुणे-संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्याच्या निमित्ताने वारकऱ्यांचे स्वागत करण्यासाठी पुणे महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणारे मंडप यावेळी उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे उभारता येणार नाहीत. याभुमिकेवरून आज पालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी प्रशासनावर टीकेची झोड उठविली .अखेर सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी या विषयावर महापौरांच्या दालनात पक्षनेत्यांची बैठक बोलावून मार्ग काढू असे सांगितल्याने या विषयावर त्तापुर्ता सभागृहात तरी पडदा पडला.
सभेच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादीच्या योगेश ससाणे ,भैय्या जाधव या नगरसेवकांनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत येत याचा निषेध व्यक्त केला. पालखी सोहळ्या दरम्यान वारकऱ्यांना सर्व सोयी सुविधा महापालिकेने पुरवाव्यात अशी मागणी यावेळी माजी उपमहापौर दीपक मानकर ,शिवसेनेच्या संजय भोसले,विशाल धनवडे यांच्या सह भाजपच्या अजय खेडेकर ,अमोल बालवडकर आदी नगरसेवकांनी केली.दिलीप बराटे आणि नगरसेवकांनी यावेळी टाळ मृदुंगाचा गजर करत जय जय राम कृष्ण हरी चा नामघोष केला .
न्यायालयाच्या आदेशानुसारकाही कार्यक्रमावर खर्च करण्यास मज्जाव केल्याने वारीवरील खर्च आणि सोयीसुविधा पुरवण्यात अडचणी येत आहेत. मात्र यातून प्रशासन आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढला जाईल, तसेच गरज पडल्यास सर्व नगरसेवक आपले मानधन देऊन हा खर्च करतील असे भाजपचे नगरसेवक सुशील मेंगडे यांनी सांगितले.तर अमोल बालवडकर यांनी सलमानखान च्या कार्यक्रमासाठी कायद्याकडे दुर्लक्ष केले जाते मग वारकऱ्यांच्या सेवेसाठी का नाही ? असा सवाल केला . महापौर चषक आणि इतर गोष्टींवर खर्च करायला पैसे आहेत, मग वारकरी सेवेसाठी का नाही असा सवाल दीपक मानकर यांनी उपस्थित केला.
लोक कायद्यासाठी कि कायदा लोकांसाठी ?गेल्या वर्षी मांडव कमी दिले ,या वर्षी मांडवच बंद ..हे अच्छे दिन अपेक्षित नव्हते असे यावेळी शिवसेनेचे विशाल धनवडे यांनी सांगितले .
काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे म्हणाले की, हा विषय खर्चाचा नसून प्रशासनाला वारकऱ्यांची सोय आणि धार्मिक उत्सव यातील फरक दिसत नसून त्यात ते गल्लत करत आहेत. वारकऱ्यांसाठी मंडप उभारणी ही त्यांची सोय आहे. यामध्ये पावसापासून बचाव व्हावा, त्यांना आरोग्य, खाण्याची सोय व्हावी हा उददेश असतो. त्यामुळे राज्य सरकारने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची विनंती त्यांनी यावेळी केली.