पुणे-आमचा उकिरडा करू नका .. “महापालिकेत येऊन फायदा काहीच झालेला नाही, पण उलटपक्षी गावचा कारभार थांबला. महापालिकेपेक्षा आमचे गाव बरे म्हणण्याची वेळ आली,’ अशा शब्दांत समाविष्ट 11 गावांमधील ‘त्या’ म्होरक्यांनी महापालिकेच्या सभागृहात ओरड केली . तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावात पायाभूत सुविधा पुरवण्याचे आश्वासन दिले होते. परंतू ते आश्वासन आजवर पाळले गेले नाही. त्यामुळे या दोन गावांना दिलेली आश्वासने पुर्ण करा अन्यथा येत्या 20 एप्रिलपासून पुणे शहराचा कचरा येऊ देणार नाही, असा इशारा फुरसुंगी ग्रामस्थांनी दिला.
पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या अकरा गावातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यासाठी पालिकेच्या मुख्य सभागृहात महापौर मुक्ता टिळक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला पालिकेचे अधिकारी आणि समाविष्ट गावातील नेतेमंडळी व नागरिक उपस्थित होते
शहराची घाण आमच्या माथी का मारता, असा प्रश्न उपस्थित करत फुरसुंगीच्या ग्रामस्थांनी या बैठकीत संताप व्यक्त केला. तसेच महापालिकेच्या हद्दीत फुरसुंगी आणि उरुळी देवाची गावांचा समावेश केल्याने कचरा डेपो विरोधातील लढा थांबेल, किंवा गावांचा समावेश केल्यांने आंदोलन होणार नाही, असे समजू नका असा इशारा फुरसुंगी गावातील नागरिकांनी दिला आहे. कचरा डेपो अन्यत्र हलवेपर्यंत कचर्याच्या विरोधातील आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
शहराच्या विविध भागांत कचरा विघटन प्रकल्प कार्यान्वीत करून टप्या-टप्याने फुरसुंगीचा कचरा डेपो बंद करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षभरापूर्वी दिले होते. फुरसुंगी आणि उरुळी देवाची गावातील युवकांना महापालिकेत नोकरी देण्याचे आश्वासनही दिले होते. नोकरी दिलेल्यांना सहा महिन्यात कामावरून काढून टाकण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी दिलेली आश्वासने पाळली नाहीत. त्यांनी एकप्रकारे आमची फसवणुकच केली आहे. गावातील विकासकामे करण्यसाठी त्वरीत निवीदा प्रक्रीया राबवावी, अन्यथा 20 एप्रिलपासून शहराचा कचरा फुरसुंगी कचरा डेपोकडे येऊ दिला जाणार नाही, असा ईशारा यावेळी फुरसुंगी ग्रामस्थांनी दिला.
फुरसुंगीचे संजय हरपळे म्हणाले, “”गावकऱ्यांनी लाखो रुपयांचा कर भरला पण, एक एस्केव्हेटर (जीबी) किरकोळ कारणावरून बंद आहे. अशी कामे करता येत नसेल, आम्ही महापालिकेत का घेतले ? डेपोत टप्प्या-टप्प्याने कचरा बंद करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले, त्याचे काय झाले ? “गावकऱ्यांच्या मागण्या केवळ कागदांवर ठेवल्या जातात. त्यांची पूर्तता करा, अन्यथा पंधरा दिवसांत गावकारी पुन्हा आंदोलनाची पवित्रा घेतील. कचरा डेपोबाबतची भूमिका स्पष्ट न केल्यास डेपोत कचरा येऊ देणार नाही,” अशा शब्दांत संजय हरपळे यांनी इशारा दिला .
उंड्रीचे सचिन घुले म्हणाले, “गावांचा विकास होईल, चांगल्या सेवा मिळतील, ही आशा खोटी ठरली. एकाही समस्येकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. तेव्हा गावांत महापालिकेची राजवट का आणली ? नवे शैक्षणिक वर्षे सुरू होणार आहे. त्यामुळे शाळांच्या व्यवस्थापनाकडे लक्ष द्यावे.’
शंकर हरपळे, श्रीरंग चव्हाण, दीपक बेलदरे, आशा बेनकर, संदीप तुपे, किशोर पोफळे, विकास कामठे, सुनील शिंदे यांनीही आपल्या भाषणात महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढले. महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, “”गावांमधील कामांचा प्राधान्यक्रम ठरविला आहे. त्यानुसार पायाभूत सुविधा प्राधान्य असेल. शैक्षणिक वर्षे सुरू होण्याआधी नियोजन करू.”

