पुणे: दिल्ली दरबारातून आणि विविध स्तरावर विविध पारितोषिके घेवून मिरविणाऱ्या पुणे महापालिकेने अपंगांची कशी हेळसांड सुरु ठेवली आहे ते आज येथे स्पष्ट झाले . अपंगांच्या प्रश्नांवर बैठक बोलवायची आणि अधिकाऱ्यांनी स्वतः गायब होत अपंगासाठी असलेल्या प्रवेशद्वारात देखील अडथळे निर्माण करून त्याकडे दुर्लक्ष करायचे असे धोरण अवलंबल्या मुले संतापलेल्या अपंगांनी भर वर्दळीच्या रस्त्यावर बैठक मारली आणि चक्क रस्ता रोको केला . या प्रकाराने पोलीस सुरक्षा रक्षकांत धावपळ उडाली ,पण सुरक्षा विभाग प्रमुख ,नागरवस्ती प्रमुख ,आयुक्त यांना या प्रकारची बहुधा खबर देखील लागली नसावी.रस्त्यावर पोलीस आणि वाहनचालकांत वादावादी झाली . अखेर दिव्यांगानीच पोलीस व सुरक्षा रक्षकांच्या विनंतीला मान देवून मोठेपणा दाखविला आणि हा रस्ता रोको मागे घेतला . पण या प्रकाराने स्मार्ट सिटी कडे निघालेल्या महापालिकेच्या प्रशासनाचे ‘रूपडे ‘मात्र दिसून आले.
महापालिकेच्या नागरवस्ती विभागात अपंगांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अपंगांना प्रवेश करता यावा यासाठी रॅम्प असलेले स्वतंत्र प्रवेशद्वार करण्यात आले आहे. या दारावर चारचाकी वाहने लावण्यात आलेली आहे. त्यामुळे अपंगांना आत प्रवेश करणे दुरापास्त झाले. त्यातच अपंगाना तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराने जा असे सांगितले गेले . त्यामुळे तिथे जमा झालेले सगळेच अपंग संतापले. प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या सचिन ओव्हाळ ,मनिषा धोत्रे यांनी सर्व अपंगाना रस्त्यावरच बैठक मारण्यास सांगितले.
महापालिका इमारतीचे काम सुरू असल्यामुळे अपंगांसाठीचा दरवाजा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे तिथे वाहने लावली जातात. त्यामुळे तिथे जमा झालेले अपंग संतापले व त्यांनी रस्त्यावरच बैठक मारत ठिय्या आंदोलन पुकारले. त्यामुळे रस्ता बंद झाला. थोड्याच वेळात तिथे पोलीस आले. संबंधित वाहनांवर कारवाई करावी व हेच प्रवेशद्वार खुले करावे. इथे रॅम्प आहे अशी मागणी केली. गर्दी वाढू लागल्याने पोलीस कर्मचारी देखील हवालदिल झाले. नागरवस्ती विभागप्रमुख अधिकारी संजय रांजणे यांच्याशी त्यांनी संपर्क साधला, पण ते कार्यालयात उपस्थित नव्हते. त्यामुळे पोलिसांनाही काही करता येईना. बराच वेळ आंदोलन सुरू होते. दरम्यान तिथे वाहतूक शाखेचे पोलिस आले. त्या वाहनांचे मालकही आले. त्यांना दंड करण्यात आला. त्यानंतर रस्ता खुला करण्यात आला.

