पुणे- महापालिकेच्या हद्दीत 34 गावांच्या समावेशाबाबत आज राज्य सरकारने मुंबई हायकोर्टापुढे प्रतिज्ञा पत्र सादर केले. त्यानुसार पुढील तीन वर्षात टप्याटप्याने 34 गावांचा शहराच्या हद्दीत समावेश करण्यात येणार असून पहिल्या टप्यात 9 गावांचा अशंत: समावेश तर फुरसुंगी व उरुळी देवाची ही दोन गावे पूर्ण अशा 11 गावांचा पुणे महापालिकेत समावेश करण्यात येणार आहे.
गावांच्या समावेशासाठी हवेली नागरिक कृती समितीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर 12 जून रोजी झालेल्या सुनावणीत या गावांबाबत तीन आठवड्यांच्या आत निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते त्यानुसार आज राज्य शासनाने आपली भूमिका स्पष्ट केली.
मात्र, पहिल्या टप्यात 11 गावांचा समावेश करण्यात येणार आहे. कारण पालिकेत सर्व गावांचा समावेश झाल्यास, संबंधित भागांतील पायाभूत सुविधांसाठी पुरेसा निधी उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तीन वर्षात टप्याटप्यात गावचा समावेश करण्याबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानुसार पहिल्या टप्यात 9 गावांचा अशंत: समावेश करण्यात येणार आहे. तर उरुळी देवाची आणि फुरसूंगी ही गावे पूर्णपणे समाविष्ट करण्यात येणार आहे, असे राज्य सरकारने स्पष्ट केले. तर उर्वरित 23 गावे पुढील 3 वर्षात टप्याटप्याने समाविष्ट करण्यात येणार आहे.