पुणे- सरकारी भूखंड एका नगरसेविकेने पतीच्या मदतीने बळकाविल्याचा प्रकार गेल्या चार महिन्यापूर्वी घडला ,राजकीय ,शासकीय आणि सामाजिक पातळीवर याबाबीची सर्वांना माहिती असूनही याबाबत सर्व गप्प -चिडीचूप असल्याचे दिसून येत आहे . विशेष म्हणजे हा भूखंड सहकारनगर सारख्या शिक्षित आणि सभ्य लोकांच्या वसाहतीत असून आणखी त्याचे मोठ्ठे वैशिष्ट्य म्हणजे हा भूखंड पोलीस चौकीला लागुनच आहे . सुमारे 2 गुंठे आकाराचा हा भूखंड कंपाऊंड टाकून ,शेड मारून ,नंतर थोडे बांधकाम करून बळकाविण्यात आला . त्यावर ओरड होऊ नये म्हणून येथे जनसुविधा केंद्र चालविण्यात येणार असल्याचे दर्शविले गेले .
गेल्या २५ सप्टेंबर २०१७ रोजी पुणे महापालिकेतील बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता गंगाप्रसाद दंडीमे यांनी या जागेवर पाहणी केली तेव्हा या जागेवर अतिक्रमण केले कोणी? हे कसे ठरवायचे असा त्यांच्या पुढे प्रश्न निर्माण झाला . म्हणून त्यांनी आहे त्या अतिक्रमणावर नोटीस डकविली .परंतु त्यास कोणीही जुमानले नाही . अखेरीस हा प्रकार त्यांनी आपले वरिष्ठ अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिला ,त्यानंतर त्यांनी या प्रकारची माहिती जिल्हाधिकारी यांना हि कळविली .मात्र तरीही अद्याप त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही . कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक कार्यकर्तेही या भागात आहेत . पण सारेच याबाबत मुग गिळून आहेत .
जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी आपल्या अखत्यारीतील या भूखंडाचे रक्षण करायला हवे , आणि विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी या प्रकारची तातडीने दाखल घेवून विनाविलंब कारवाई करायला हवी अशी स्थिती असताना त्यांच्या प्रशासकीय पातळीवर मात्र शांतता दिसते आहे .