पुणे- महापालिकेने ५५ वर्षापूर्वी ताब्यात घेतलेली अडीच एकर जागा मूळ जमीन मालकाला परत देण्याचा घाट पालिकेतील काही सभासदांनी घातला आहे. स्थायी समितीत हा प्रस्ताव गुपचूप मान्य केला. मात्र, स्थायी समिती सदस्य अविनाश बागवे, नाना भानगिरे यांनी या प्रस्तावाला फेरविचार देत याबाबत प्रशासनाचा अभिप्राय द्यावा, अशी मागणी केली होती. त्यास काल स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
पुणे पेठ पर्वती सर्वे नंबर १२० अ, १२० ब येथील २७ एकर १३ गुंठे ही जागा नगररचना (टीपी स्किम) योजनेनुसार वीटभट्टीसाठी पालिकेच्या ताब्यात आली आहे. न्यायालयात सुनावणी सुरू असताच मूळ जागा मालकांनी पालिकेच्या ताब्यात असलेले पाच प्लॉट परत मिळावेत, असा विनंती अर्ज केला आहे. या जागेचा टिडीआर देण्याबाबत मार्गदर्शन घेण्यासाठी पालिका आयुक्तांनी राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केला होता. त्याचवेळी या याचिकेबाबत उच्च न्यायालयाने २६ मार्च २०१५ रोजी अंतरिम आदेशाच्या अनुषंगाने शासनस्तरावर विधी आणि न्याय विभागाचे अभिप्राय घेण्यात आले होते. त्यावर पालिकेचा अभिप्रायही प्राप्त करून घेण्यात आलेले आहेत. या प्रकरणात उच्च न्यायालयाने १४ जुलै २०१७ रोजी आदेश दिले आहेत.
या आदेशाच्या विरोधात उच्च न्यायालयात दाखल केलेली पुर्नविलोकन याचिका आणि विधी व न्याय विभागाने दिलेले अभिप्राय विचारात घेऊन पालिकेने पुढील कार्यवाही करावी, असे पत्र राज्यसरकारचे अवर सचिव रा.म.पवार यांनी ९ डिसेंबर २०१२ रोजी पाठविले आहे. त्यावर पालिकेने यातील चार फ्लॉट मूळ जागा मालकाला परत द्यावेत, विशेष बाब म्हणून राज्य सरकारकडे हा प्रस्ताव पाठवून त्यांच्या स्तरावर निर्णय घेण्यात यावा, असा प्रस्ताव स्थायीने मंजूर केला आहे. त्याला शिवसेना आणि काँग्रेसने फेरविचाराचा प्रस्ताव दिला होता. तो मंजूर करण्यात आला आहे.