पुणे- महापालिकेच्या गुरुवारी झालेल्या खास सभेमध्ये गोंधळाच्या वातावरणात सार्वजनिक स्वछता व आरोग्य उपविधी आणि एकात्मिक सायकल आराखडा या दोन्ही विषयांना मंजुरी देण्यात आली. मात्र या योजना गोंधळामध्ये चुकीच्या प्रकारे मतदान घेऊन मान्य करण्यात आल्याच्या आरोप करीत विरोधीपक्ष नेते चेतन तुपे यांनी या योजनांची अंलबजावणी करू नये असे पत्र आयुक्त कुणाल कुमार यांना दिले आहे.
या पत्रात तुपे यांनी म्हटले आहे की, नागरिकांना स्वच्छतेचे महत्व कळावे म्हणून तयार करण्यात आलेली ‘स्वच्छता उपविधी’ तसेच वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या ‘सायकल शेअरिंग योजने’चा प्रस्ताव गुरुवारी चर्चा न करताच गोंधळात मंजूर करण्यात आला. नागरिकांच्या दृष्टीने हे विषय महत्त्वाचे असल्याने त्यावर सविस्तर चर्चा होऊन निर्णय घेणे अपेक्षित असतानाही सत्ताधारी भाजपबरोबरच विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी आपला हेका कायम ठेवल्याने गोंधळाच्या वातावरणातच दोन्ही प्रस्ताव मान्य करण्यात आले.
मात्र सदर विषय बेकायदेशीरपणे मुख्यसभा कामकाज नियमावलीचे उल्लंघन करत करण्यात आले असून या दोन्ही विषयांवर फेरविचार विरोधीपक्षांने दिला आहे. त्यामुळे फेरविचारावर मुख्यसभा निर्णय घेत नाही तोपर्यंत या योजनांची अंलबजावणी करू नये असे पत्र तुपे यांनी आयुक्तांना दिले आहे.