पुणे- खासदार संजय काकडे म्हणजे होणार तेच ते बोलणार … या उक्तीचा आता उत्कृष्ट प्रचार झाला आहे . आणि भाजपमधील वरिष्ठ नेत्यांमध्ये त्यांची गणना होऊ लागली आहे , त्यामुळे आता पुण्याचा महापौर कोण ? उपमहापौर कोण ? स्थायी समिती अध्यक्ष कोण ? असे प्रश्न नानांना विचारले जावू लागले आहेत . आणि महापौरपदासाठी तर नानांनी चक्क ..मुक्ता टिळक यांचे नाव घेतल्याने .. मराठा लॉबीला आश्चर्याचा धक्का बसला आहे . मुख्यमंत्री देखील टिळक यांच्याच नावाला पाठींबा देतील असे सांगण्यात येते आहे . अर्थात टिळक घराण्याचे नाव मोठे आहे , जयंतराव टिळक कॉंग्रेसमध्ये होते रोहित टिळक कॉंग्रेस मध्ये आहेत मात्र मुक्ता टिळक २० वर्षे भाजपमध्ये आहेत . कधी हि कोणत्याही कामाला अडवून ठेवणार नाहीत अशी त्यांची ख्याती आहे आणि ‘राजकारणी’ म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात नाही हे विशेष .
महापालिकेतील महापौर पदासह अन्य महत्त्वाच्या पदांसाठी आपल्याच माणसाची वर्णी लागावी यासाठी खासदार संजय काकडे सक्रिय झाले असल्याची चर्चा पक्षात असताना आणि त्यामुळे पक्षातील निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता असताना महापौर पदासाठी काकडे यांनी ज्येष्ठ नगरसेविका मुक्ता टिळक यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. महापालिकेत भाजपला बहुमत मिळाल्यानंतर टिळक याच महापौर पदावर बसण्यास योग्य व्यक्ती आहेत, असे खासदार काकडे यांनी बुधवारी मायमराठी शी बोलताना स्पष्ट केले.
महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर महापौर आणि अन्य पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली होती. मात्र महत्त्वांच्या पदावर आपल्याच नगरसेवकांची वर्णी लागावी यासाठी खासदार संजय काकडे यांनी प्रयत्न सुरू केल्याचे भाजपमध्येच सांगितले जात होते. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी काही तास आधी राष्ट्रवादीतून ऐन वेळी भाजपमध्ये आलेल्या रेश्मा भोसले यांनाच महापौर करण्यासाठी काकडे यांनी हालचाली सुरू केल्याचीही चर्चा होती. त्यामुळे भाजपच्या निष्ठावंतांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली होती.