खा. वंदना चव्हाण यांनी नदीपात्रात टाकण्यात येणारा राडारोडा आणि कचऱ्यासंदर्भात पुणे मनपाला वेळोवेळी निदर्शनाला आणून दिलेले होते. दोन दिवसांपूर्वीच दि. २८ मे रोजी, संभाजी पुलाच्या खालील नदीपात्रात महापौर दत्तात्रय धनकवडे आणि आयुक्त कुणाल कुमार यांच्या सह त्यांनी भेट देवून परिस्थितीची पाहणी केली होती. त्यावेळी नदीपात्रात महानगरपालिकेनेच राजरोसपणे कचऱ्याचे ४ कंटेनर, मुरूम, दगड आणि फारश्या टाकलेल्या दिसून आल्या होत्या. तसेच नदीपात्रात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर फोर व्हीलरचे पार्किंग केले जात असल्याचे दिसून आले होते. आयुक्तांनी याबाबत दखल घेवून त्वरित कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले होते. परंतु आज रोजी खा. वंदना चव्हाण यांनी पुन्हा नदीपात्राची पाहणी केली असता पूर्वीच्या ४ कंटेनर च्या जागी आता १० कचऱ्याचे कंटेनर ठेवले गेले होते. तसेच त्यातील कचरा पेटवून दिला होता. तसेच निकामी झालेले कंटेनर देखील गोडावून सारखे नदीपात्रात टाकून देण्यात आले होते. नदीपात्रात तयार करण्यात येत असलेल्या जोग्गिंग ट्रेक साठी अनेक गाड्या भरून मुरूम, दगड आणि फरश्या टाकण्यात आल्या होत्या.
आयुक्तांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करून सुद्धा काहीही कारवाई न करता मनपाने आणखी त्यात भर घातल्याने खा. वंदना चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी नदीपात्रातच ठिय्या आंदोलन सुरु केले. जोपर्यंत आयुक्त स्वत: येवून याबाबत जोपर्यंत ठोस पावले उचलत नाहीत तोपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी खा. वंदना चव्हाण म्हणाल्या कि, “नदीपात्राला महानगरपालिकेने डंपिंग ग्राउंड बनविले आहे. बांधकामाचा राडारोडा नदीत टाकला जावू नये याबाबत कोणत्याही उपाययोजना केल्या गेलेल्या नाहीत. नदीची वहन क्षमता कमी होईल असे कोणत्याही प्रकारचे पक्के बांधकाम करण्याची परवानगी नसताना तेथे बाहेरून मुरूम, दगड आणि फारश्या आणून विकासकामे केली जात आहेत. ती कामे तातडीने थांबवावीत आणि नदीपात्रातील पार्किंग बंद करावे अशी त्यांनी मागणी केली.” नंतर आयुक्त कुणाल कुमार आणि उपायुक्त सुरेश जगताप यांनी पुन्हा नदीपात्राची पाहणी केली आणि तेथील निकामी कंटेनर, कचरा, मुरूम, दगड आणि फारश्या एका तासात उचलला जाईल असे आदेश प्रशासनाला दिले. याबाबत मनपा पुढे काय कारवाई करते याकडे सर्वांनाच लक्ष द्यावे लागेल.







