पुणे – महापालिकेचा डेटा गायब झाल्याच्या सकाळ मधील वृत्ताचे काल मुख्य सभेत पडसाद उमटले. सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनाला याबाबत धारेवर धरले. त्याची दखल घेऊन, महापौर मुक्ता टिळक यांनी याबाबत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील (सीओईपी) तज्ज्ञांची मदत घेऊन, चौकशी करण्याचा आदेश प्रशासनाला दिला. तसेच, दरम्यानच्या काळात माहिती तंत्रज्ञान विभागातील संबंधित अधिकाऱ्यांकडून ते काम काढून घेण्यासही त्यांनी सांगितले.
डेटा गायब झाल्यामुळे ‘बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज’ (बीएसई)कडे महापालिकेला ताळेबंद सादर करता आलेला नाही. डेटा ‘लॉस्ट’ आणि ‘करप्ट’ झाल्याचे महापालिकेने लेखी पत्राद्वारे ‘बीएसई’ला कळविले आहे. त्याबाबतचे वृत्त ‘सकाळ’मध्ये गुरुवारी प्रसिद्ध झाले. त्याचे पडसाद महापालिकेच्या सभेत उमटले. नियोजित योजना, त्यांचा खर्च, निविदांमधील गैरव्यवहार आणि सल्लागार कंपन्यांवरील उधळपट्टी लपवण्यासाठीच कर्जरोख्यांसह महापालिकेच्या तब्बल साडेपाच हजार कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाचा हिशेब गायब केल्याचा आरोप सर्वपक्षीय सदस्यांनी केला. ही माहिती लपविण्यामागे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हात असून, या प्रकरणाची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागातर्फे (सीबीआय) चौकशी करावी, अशी मागणी सदस्यांनी केली.
सभागृहनेते श्रीनाथ भिमाले म्हणाले, ‘‘शहरातील संपूर्ण माहिती सुरक्षित असणे अपेक्षित आहे. परंतु, ती नष्ट झाली असेल तर ही बाब गंभीर आहे, त्याची चौकशी व्हावी.
नेमके सभागृहात काय झाले ..ते पहा आणि ऐका …

