पुणे- प्रभागातील जातीनिहाय मतदारांची संख्या त्यानुसार मतांचे समीकरण आणि ताकद ,पैसा पाहूनच सर्व राजकीय पक्ष आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारी वाटप करतील असे स्पष्ट दिसत असल्याने तसेच यावेळी विकासाऐवजी जाती नुसार मतदान होण्याची बहुतांशी शक्यता वाढल्याने मुंबई सह नाशिक आणि पुणे महापालिकेतील सत्तेला हादरे बसण्याची चिन्हे आहेत .
मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्यासाठी राज्यभर जातीपातीचे राजकारण होत आहे, फोडाफोडीचे राजकारणही सुरु आहे . या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी जरी जाहीर केला तरी न्यायालयाचा त्यात अडसर राहीलच असे अनेकांचे मत आहे. एकीकडे मराठा ,(मराठ्यांमध्ये देखील ओबीसी हा वेगळा गट ) दुसरीकडे दलित ,तिसरीकडे,ब्राम्हण , चौथीकडे गुजराती,मारवाडी आणि मुस्लीम समाज यांच्या एकत्रित मतांची संख्या आणि गणना राजकीय पक्षांच्या हितचिंतकांनी बहुधा सुरु केली असावी . आणि बहुतेकांना असे वाटत आहे कि यावेळी जातीय मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढेल . महागाई, मुलभूत नागरी सुविधा यांचा आता चावून चावून चोथा झाला आहे. यातून कोणीही आले तरी काही साध्य होत नाही, हा अनुभव वारंवार जनतेला येतोच आहे. अशा स्थितीत तात्पुरत्या फायद्यांना भुलणारा कार्यकर्ता .. आणि तात्पुरत्या फायद्यांसाठी निवडणुकीपुरता पुढे येणारा वर्ग हा फार मोठ्या संख्येने राहील असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे . नवरात्रीमध्ये महिलांना विविध वस्तूंचे वाटप ,वार्डस्तरीय विकासाच्या कामा प्रसंगी अनेकांना घरदुरुस्तीसाठी .. सिमेंट,विटा, तदनुषंगिक सहाय्य घेताना अनेकजण दिसत आहेत. या सर्व बाबींचा विचार करता जातीबरोबर धनशक्तीची उधळण करणारी मंडळी यावेळी तिकिटे मिळवण्यात यशस्वी होतील असा प्रवाह आहे .
मात्र अशा बाबींमुळे सामाजिक सौख्यापासून माणसे आणखी दूर दूर जात राहण्याची भीती नाकारता येणारी नाही .