पुणे – महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी झालेल्या मतदानात १४ लाख १० हजार ९७४ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. हे प्रमाण एकूण मतदारांच्या ५५.५० टक्के ऐवढे आहे. यामध्ये शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या शनिवार व सदाशिव पेठेत सर्वाधिक मतदान झाले आहे. विमाननगर-सोमनाथनगर प्रभागात सर्वात कमी म्हणजे ४५.९४ टक्के मतदान झाले.
हडपसर गावठाण-सातववाडी (प्रभाग क्र. 23), मुंढवा-मगरपट्टा सिटी (प्रभाग 22) आणि कोरेगाव पार्क-घोरपडी या प्रभागांकरिता सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. तेव्हापासून या केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक, महिला आणि नवमतदारांच्या रांगा लागल्या होत्या. बहुभाषिक मतदार असलेल्या कोरेगाव पार्कमधील केंद्रांवर मात्र मतदारांचा फारसा उत्साह दिसून आला नाही. दुसरीकडे, त्या-त्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते नागरिकांना मतदानासाठी केंद्रावर आणण्यासाठी घरोघरी जात होते. माजी महापौर वैशाली बनकर, चंचला कोद्रे, राजलक्ष्मी भोसले यांनी सकाळीच आपल्या कुटुंबीयांसह मतदान केले. पाठोपाठ माजी उपमहापौर बंडू गायकवाड, चेतन तुपे यांनी मतदान केले.