पुणे– बेरोजगार तरूणांना रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे, यादृष्टीने पुणे महानगरपलिकेच्या समाजविकास विभाग व जिल्हा कौशल्य विकास रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 26) भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती समाजविकास विभागातील अधिकारी संजय रांजणे यांनी दिली.
शिवाजीनगर येथील मॉडर्न कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात सकाळी 9.30 ते सायंकाळी 4 या वेळेत हा रोजगार मेळावा होणार आहे. या मेळाव्यात आठवी पास विद्यार्थ्यांपासून ते कौशल्य प्रशिक्षण घेतलेल्या बेरोजगार विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांतील रोजगाराच्या संधींची दारे खुली होणार आहेत. या मेळाव्यात फोर्स मोटर्स, महिंद्रा व्हेईकल्स, टाटा बिझनेस सपोर्ट, महालक्ष्मी अॅटोमोटिव्हज, व्हील्स इंडिया, कायनेटीक इंजिनीअरींग, सॅण्डविक एशिया, बजाज फिनसर्व्ह यासारख्या 43 नामांकित कंपन्या त्या त्या पदासाठी असलेल्या पात्रतेच्या उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड करणार असून त्यांना तात्काळ निवडपत्रे दिली जाणार आहेत.
या रोजगार मेळाव्यात 2825 पदांची भरती करण्यात येणार आहे. इच्छुक तरूण – तरूणींनी उद्या कागदपत्रांसह मेळाव्याच्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन पुणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे