पर्यावरणाचे रक्षण करत मुंबईचा सुनियोजित विकास करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Date:

  • वांद्रे कलानगर जंक्शन येथील उड्डाणपुलाच्या एका मार्गिकेचे उद्घाटन
  • शिवडी ते वरळी उन्नत मार्ग प्रकल्पाचे भूमिपूजन
  • बीकेसी सायकल ट्रॅक व पथदर्शी पदपथाचे लोकार्पण तसेच स्मार्ट वाहनतळाचे उद्घाटन

मुंबई दि 21:- मुंबईच्या विकासासाठी पायाभूत सुविधांची कामे सुनियोजितपणे तसेच पर्यावरणाचे जतन करत करण्यावर भर देणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

एमएमआरडीएच्या वांद्रे येथील कलानगर जंक्शन उड्डाणपुलाच्या एका मार्गिकेचे उद्घाटन,शिवडी ते वरळी उन्नत मार्ग प्रकल्पाचे भूमिपूजन,बीकेसी सायकल ट्रॅक व पथदर्शी पदपथाचे लोकार्पण तसेच स्मार्ट वाहनतळाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले.

यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, नगरविकासमंत्री श्री.. एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री ॲड.अनिल परब, कौशल्य विकासमंत्री श्री. नबाव मलिक, पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे, विरोधी पक्ष नेते श्री. प्रवीण दरेकर,आमदार झिशान सिद्दीकी, आमदार डॉ.मनिषा कायंदे, आमदार सदा सरवणकर,खासदार राहुल शेवाळे व एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर.ए. राजीव, अतिरिक्त महानगर आयुक्त के.एच गोविंदराज तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबईचा यापुढे सुनियोजित विकास करण्यावर भर देण्यात येईल. एमएमआरडीएची पायाभूत सुविधांची कामे आव्हानात्मक आहेत. तसेच ती कौतुकास्पदही आहेत. मुंबईत वाहतूक समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर स्मार्ट पद्धतीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.त्यासाठी पार्किंगची व्यवस्था देखील आधुनिक पद्धतीने करावी लागेल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर भर देतानाच ती सर्वांना परवडणारी कशी होईल हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  मुंबईसारख्या शहरात आजही सायकल चालवली जाते, यासाठी स्वतंत्र ट्रॅक असणे गरजेचे आहे. ही सर्व विकासकामे करत असतानाच पर्यावरण रक्षण करण्यावरही भर देण्यात येत असल्याचे श्री. ठाकरे यांनी सांगितले.

नगरविकास मंत्री  तथा एमएमआरडीएचे अध्यक्ष श्री. एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबईतील हे महत्त्वाचे पायाभूत प्रकल्प आहेत. यामुळे वाहतुकीत मोठी सुधारणा होईल. वेळ आणि पैशाची बचत होईल. मुंबई आणि नवी मुंबई तसेच रायगड जिल्ह्याला जोडणारे हे प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. या पायाभूत सुविधा उभारणी कामांबरोबरच एमएमआरडीएने कोविड संकटकाळात मोठी कोविड सेंटरही उभारली. हे उल्लेखनीय आहे. एमएमआरडीएचे सर्व प्रकल्प वेगात प्रगतीपथावर असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.

पर्यावरणमंत्री श्री. आदित्य ठाकरे म्हणाले, एमएमआरडीएची मुंबईत होत असलेली पायाभूत सुविधांची कामे आव्हानात्मक आहेत. कारण यातील अनेक कामे दाट लोकवस्तीत होत आहेत. या कामांमुळे स्थलांतरित होत असलेल्यांचे पुनर्वसन याच भागात करण्यावर भर देण्यात येत आहे. वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येत आहे. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान व सुविधांचा वापर करण्यात येत आहे. चालणाऱ्यांसाठी पदपथ महत्त्वाचे असतात. त्याचीही उभारणी करण्यात येत आहे. सायकल ट्रॅकही उभारण्यात येणार आहेत.

नागरिकांना ‘इज आँफ लिव्हिंग’चा अनुभव घेता आला पाहिजे या दृष्टीने पर्यावरणाचे रक्षण करत या सर्व पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येत असल्याचे श्री. ठाकरे यांनी सांगितले.

प्रास्ताविकात एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर.ए. राजीव म्हणाले, एमएमआरडीएमार्फत उभारण्यात येणाऱ्या या सर्व प्रकल्पांतील कामे आंतरराष्ट्रीय दर्जाची व वैशिष्ट्यपूर्ण असणार आहेत. एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त डॉ. के.एच. गोविंदराज यांनी आभार मानले.

शिवडी ते वरळी उन्नतमार्ग

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मुंबई पारबंदर प्रकल्पाच्या मुंबई बाजूकडील वाहतूक विकीरण व्यवस्थेकरिता शिवडी ते वरळी उन्नतमार्ग प्रकल्पाचे बांधकाम हाती घेतले आहे. मुंबई पारबंदर प्रकल्पावरुन येणाऱ्या वाहतुकीस शिवडी वरळी उन्नत मार्गाने वरळी पर्यंत पोहचून वांद्रे – वरळी सागरी सेतूने वांद्रे येथून पश्चिम उपनगरांकडे जाता येईल. प्रस्तावित उन्नत मार्गाची  लांबी सुमारे 4.5 कि.मी इतकी आहे.

कलानगर जंक्शन, बाद्रां (पु.), मुंबई इथे उड्डाणपुल

सद्यस्थितीत कलानगर जंक्शन येथे पश्चिम द्रुतगती महामार्ग, बांद्रा – कुर्ला जोडरस्तासहित इतर तीन मार्ग येऊन मिळतात. त्यामुळे जंक्शनवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. प्रस्तावित उड्डाणपुलामुळे  कलानगर जंक्शनवरील  वाहतुक सुरळीत होऊन वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. वाहतुकीच्या वेळेत बचत होणार आहे.

वांद्रे कुर्ला संकुलातील जी-ब्लॉकमध्ये पदपथ व जंक्शन

वांद्रे कुर्ला संकुलातील प्रस्तावित नवीन मेट्रो मार्गामुळे पादचाऱ्यांची संख्या वाढणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक दुचाकींचा वापर लोकप्रिय होत आहे. जंक्शनदरम्यानच्या  रस्त्यांवर  सुरक्षित सायकल ट्रॅक, वर्दळमुक्त पादचारी क्षेत्र इत्यादी सुविधा वाढविणे, पार्किंग, इ- चार्जिंग, आसनव्यवस्था, कचराकुंड्या, बोलाड्स, वाहतूक चिन्हफलक इत्यादीसह स्ट्रीट फर्निचर इ.ची तरदूत करण्यात आली आहे.

  • सलग आणि सुरक्षित सायकल ट्रॅक
  • अस्तिवात असलेल्या झाडांची मुळांचे रक्षण करणे व नवीन झाडे लावण्यासाठी सछिद्र काँक्रिट जाळी इ. चा वापर करुन झाडांचे संरक्षण करण्याचे नियोजन
  • वाहनांच्या ई- चार्जिंग साठी जागा

वांद्रे कुर्ला संकुल येथील स्मार्ट वाहनतळ प्रकल्प

बांद्रा – कुर्ला संकुल व नरिमन पाँईंट येथील विविध वाहनतळांसाठी स्मार्ट पार्किंग  तत्वावर स्वयंचलित वाहनतळे, वाहने पार्क करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा, ॲप विकसित करणे, पार्किंग शुल्क वसुल करण्यासाठी ऑनलाईन प्रणाली, वाहनतळामध्ये इलेक्ट्रिक चार्जिंग सोलर, चार्जिंगची सुविधा, विश्रांतीगृह तसेच खानपानाची सुविधा.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...