मुंबई, : मुंबईतील हवाईमार्गात (फनेल झोन) येणाऱ्या विमानतळ परिसरातील उंच इमारतींचा पुनर्विकास करण्यासंदर्भात राज्य शासनाने प्रारुप आराखडा तयार केला असल्याची माहिती, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.
सदस्य सुनील प्रभू, अमीन पटेल, रविंद्र वायकर आदींनी उपस्थित केलेल्या नियम २९३ अन्वये प्रस्तावावर उत्तर देताना श्री. शिंदे बोलत होते.
नगरविकास मंत्री श्री. शिंदे म्हणाले, मुंबईतील फनेल झोनमध्ये अनेक उंच जुन्या इमारती आहेत. त्यांची उंची वाढविता येणार नसली तरी या इमारतींचा पुनर्विकास करण्यासंदर्भात राज्य शासनाने प्रारुप आराखडा तयार केला आहे. यामध्ये फनेल झोन मधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी सवलती देण्याविषयी विचार करण्यात आला आहे. या इमारतींचा पुनर्विकास करण्याबाबत शासन सकारात्मक असून या भागातील नागरिकांना न्याय देण्यात येईल,असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.
मेट्रोमुळे मुंबईतील वाहतूक कोंडी दूर होणार
मुंबईतील मेट्रो प्रकल्पाची कामे प्रगतीपथावर आहेत. काही कामे पूर्णत्वास आली आहेत. एकूण ३२७ किलो मीटरच्या मेट्रो प्रकल्पाची कामे पूर्ण झाल्यानंतर शहरातील वाहतूक कोंडी दूर होणार आहे. रेल्वेवरील ताणही कमी होणार आहे, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.
ठाणे महानगरपालिकेलगतच्या १४ गावांचा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये समावेश करण्याबाबतचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. या १४ गावांतील रहिवासी नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. या गावांसंदर्भात सर्व तांत्रिक व कायदेशीर बाबी तपासून त्यांचे नवी मुंबईत समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश नवी मुंबई मनपा आयुक्तांना दिले असल्याचेही श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले.
नगरविकास विभागाच्या माध्यमातून विकासकापासून ते सामान्य नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत कोणत्याही विकासकामांना कात्री न लावता राज्याच्या विकासाला चालना दिली असल्याचे श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

