गुंतवणुकी संदर्भातील युएई-भारत उच्चस्तरीय संयुक्त कार्य दलाची दहावी बैठक आज मुंबईत झाली. भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि अबु धाबीच्या अमिराती कार्यकारी परिषदेचे सदस्य शेख हमेद बिन झायेद अल नाह्यान यांनी बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवले.
उभय देशांतील संयुक्त कार्य दलाची स्थापना 2013 मध्ये व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आली होती. भारत-यूएई सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर (सीईपीए) स्वाक्षरी केल्यानंतर आणि फेब्रुवारी 2022 मध्ये दूरदृश्य माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युएईचे राष्ट्राध्यक्ष महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्यात झालेल्या शिखर परिषदेदरम्यान युएई-भारत संयुक्त दृष्टीकोन घोषणापत्राचे अनावरण केल्यानंतर संयुक्त कार्य दलाची ही पहिली बैठक होती.

दोन्ही शिष्टमंडळांनी भारत-यूएई द्विपक्षीय गुंतवणूक कराराच्या वाटाघाटींच्या स्थितीचा आढावा घेतला. आतापर्यंत वाटाघाटीच्या बारा फेऱ्या झाल्या आहेत. वाटाघाटी सुरू झाल्यापासून बरीच प्रगती साधता आली असती असे दोन्ही बाजुंनी नमूद केले. म्हणूनच त्यांनी संतुलित आणि परस्पर फायदेशीर करार लवकर फलद्रुप व्हावा यासाठी प्रक्रियेला गती देण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चारही केला.
भारताचे वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण, वस्त्रोद्योग मंत्री आणि संयुक्त कार्य दलाचे सह-अध्यक्ष पीयूष गोयल यांनी यावेळी बैठकीला संबोधित केले. “संयुक्त कृती दलाच्या शेवटच्या बैठकीदरम्यान सीईपीएच्या वाटाघाटी वेगाने मार्गी लावण्याचे आम्ही ठरवले होते. आम्ही 88 दिवसांच्या कमी काळात कराराला अंतिम रूप दिले. मला खात्री आहे की अन्न सुरक्षा आणि राष्ट्रीय चलनांमधील द्विपक्षीय व्यापार यांसारख्या परस्पर फायदेशीर क्षेत्रांवर आज आपण जी चर्चा केली, त्यावरही दोन्ही बाजूंनी समान विश्वास दिसून येईल, असे ते म्हणाले. भारत-यूएई संबंध अभूतपूर्व गतीचे साक्षीदार आहेत. आमच्याकडे सहकार्यासाठी आणि गुंतवणुकीत वाढ करण्यासाठी विशेषत: पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान, फिनटेकसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात संधी आहेत, असेही गोयल यांनी सांगितले.

बैठकीच्या शेवटी, अबु धाबीच्या अमिरातीच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य आणि संयुक्त कार्य दलाचे सह-अध्यक्ष, शेख हामेद बिन झायेद अल नाह्यान म्हणाले:
“ऑक्टोबर 2021 मध्ये संयुक्त कार्य दलाच्या शेवटच्या बैठकीपासून, भारत आणि युएई मधील निकटचे, वाढणारे आणि धोरणात्मक संबंध दृढ करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण टप्पे गाठले गेले आहेत.या व्यापक संदर्भाच्या अनुषंगाने, संयुक्त कार्यदल उभय देशांमधे सकारात्मक संवाद साधला जात आहे आहे. यामुळे आपण आर्थिक दुवे मजबूत करत आहोत. परिणामी आपली राष्ट्रे एकत्र येण्यास मदत झाली आहे. नवीन संधी निर्माण करण्यात आणि अडथळे दूर करण्यात संयुक्त कार्य दल प्रभावी ठरले आहे. उभय देशांच्या वाढीच्या पाठबळ देण्यासाठी द्विपक्षीय गुंतवणुकीला चालना देण्याकरीता ती महत्त्वाची भूमिका बजावत राहील.”
यूएईचे परराष्ट्र व्यापार राज्यमंत्री डॉ. थानी बिन अहमद अल झेउदी, यूएईचे भारतातील राजदूत डॉ अहमद ए.आर. अल्बन्ना, उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाचे सचिव अनुराग जैन आणि संबंधित सरकारी अधिकारी, दोन्ही देशांतील गुंतवणूक संस्था आणि कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

