‘पिंजरा’ … त्यो कुनाला चुकलाय ?
अवो मानसाचं घर तरी काय असतं?
त्योबी एक पिंजराच की!
हे तत्वज्ञान आपल्या रांगड्या भाषेत सांगणारी तमाशातील एक नर्तकी आणि
“व्यक्ती मेली तरी चालेल पण समाजापुढील आदर्श जिवंत राहिले पाहिजेत”
या महान तत्वावर श्रद्धा असलेला एक माणूस या दोघांच्या संघर्षाची हृदयस्पर्शी कथा म्हणजे…पिंजरा.
आसक्ती आणि विरक्ती यातलं द्वंद्व सुरेखरित्या उभं करणारा पिंजरा.
काळाच्या ओघात काही अभिजात कलाकृती तितक्याच टवटवीत व लक्षात रहातात. प्रत्येकाच्या मनःपटलावर या कलाकृतींच एक वेगळंच स्थान असतं. ७० च्या दशकात आलेल्या व्ही. शांताराम दिग्दर्शित पिंजरा या चित्रपटानेही रसिक प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. या सुंदर कलाकृतीचा नजराणा पुन्हा सादर करावा असं कोणाला वाटलं नसतं तरच नवल !
गेल्या चाळीस वर्षांत अपार लोकप्रियता लाभलेल्या पिंजरा या सिनेमाची जादू आता पुन्हा अनुभवता येणार आहे. डॉ श्रीराम लागू, संध्या, निळू फुले यांच्या जबरदस्त अदाकारीने नटलेला पिंजरा १८ मार्चला राज्यभरातील सिनेमागृहात दाखल होणार आहे. नव्या अंदाजातला हा सिनेमा जुन्या आठवणींना उजाळा देत स्मृतिरंजनाचा अनोखा आनंद प्रेक्षकांना देणार आहे.
वेगळा प्रयोग करताना त्यासाठी अनेक गोष्टींचा तपशीलवार विचार करावा लागतो. या चित्रपटाच्या डिजिटलायझेशनची प्रक्रिया ही सोपी नव्हती. पुरुषोत्त्म लढ्ढा आणि सौ चंद्रसेना पाटील यांच्या पुष्पक प्रियदर्शनी फिल्म्सने व्ही. शांताराम प्रोडक्शनकडून किरण शांताराम यांच्या सहकार्याने वितरणाचे हक्क घेत प्रसाद लॅबमध्ये या चित्रपटाच्या ओरिजिनल प्रिंटवर प्रक्रिया करत तिचे २ के स्कॅनिंग करत नवी अद्यावत प्रिंट तयार केली. हॅंड क्लिनिंग, अल्ट्रासॉनिक क्लिनिंग, २ के स्कॅनिंग, ऑडिओ ग्रॅबिंग, कलर ग्रेडिंग, ऑडिओ रीस्ट्रोरेशन या नानविध तांत्रिक प्रक्रिया करून या अभिजात कलाकृतीला आधुनिकतेचा नवा साज चढवला आहे.
पिंजरा चित्रपटातील आली ठुमकत नार लचकत, छबीदार छबी, तुम्हांवर केली मी मर्जी बहाल, मला इष्काची इंगळी डसली, दिसला ग बाई दिसला, कशी नशिबानं थट्टा, दे रे कान्हा चोळीलुगडी या गीतांच गारुड आजही तितकंच आहे. खेबुडकरांचे विलक्षण आशयपूर्ण शब्द आणि रामभाऊंच्या अस्सल मराठमोळ्या ठसक्याच्या चालींना आधुनिक पार्श्वसंगीताची किनार देत संगीतकार अविनाश–विश्वजीत यांनी अद्यावत वाद्यवृंदासह या गाण्यांना नवा मुलामा दिला आहे.
संवाद, गाणी, पार्श्वसंगीत, तांत्रिकबाबी या महत्त्वपूर्ण गोष्टींचे विभाजन करत त्यात काही बदल करण्यात आला आहे. चित्रपटाचा मूळ मोनो ऑडियो हा आता ५.१ करण्यात आला आहे. एकंदरीतच मूळ कलाकृतीला धक्का न लावता नव्या अंदाजातील पिंजरा पुन्हा रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सज्ज झाला आहे.
व्ही. शांताराम प्रॉडकशन्स
पिंजरा
दिग्दर्शन व संकलन : व्ही. शांताराम
भूमिका :
संध्या, डॉ श्रीराम लागू
निळू फुले, वत्सला देशमुख, माणिकराज, गोविंद कुलकर्णी, कृष्णकांत दळवी, सरला येवलेकर, आबू, शोभा, अनिता, उषा, माया, भालचंद्र कुलकर्णी, गावडे, बर्ची बहाद्दर, काका चिटणीस, के.घोरपडे, बोराटे, तावरे, पी. आनंद, औंधकर.
कथा कल्पना : अनंत माने,
संवाद : शंकर पाटील
संगीत : राम कदम
गीते : जगदीश खेबुडकर,
छाया : शिवाजी सावंत
ध्वनी : ए.के परमार, लिंगनूरकर,
पुर्नमिश्रण व गीतमुद्रण : मंगेश देसाई
कला : बाबूराव जाधव
नृत्ये : रंजन साळवी
रंगभूषा : शशी साटम
एक गाणे –आपल्यासाठी—-
तुम्हावर केली मी मर्जी बहाल
नका सोडून जाऊ रंगमहाल ॥धृ.॥
गायक :उषा मंगेशकर
गीतकार :जगदीश खेबुडकर
संगीतकार :राम कदम
चित्रपट :पिंजरा (१९७७)
पापण्यांची तोरणं बांधून डोळ्यावरती
ही नजर उधळीते काळजातली पीरती
जवळी यावं मला पुसावं, गुपित माझं खुशाल ॥१॥
हुरहूर म्हणू की ओढ म्हणू ही गोड
या बसा मंचकी, सुटल गुलाबी कोडं
विरह जाळीता मला रात ही पसरी मायाजाल ॥२॥
लाडेलाडे अदबीनं तुम्हां विनवते बाई
पिरतीचा उघडला पिंजरा तुमच्या पायी
अशीच र्हावी रात साजणा, कधी न व्हावी सकाळ ॥३॥