प्रसिद्ध संगीतकार उत्तम सिंग यांना ‘एस. डी. बर्मन इंटरनॅशनल अॅवॉर्ड’ जाहीर , अॅनिमेशन विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल राम मोहन यांचाही होणार गौरव ,मराठी चित्रपट स्पर्धात्मक विभागाच्या अंतिम फेरीतील ७ चित्रपटांचीही घोषणा
पुणे : यंदाच्या १४ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते आणि कवी सौमित्र चॅटर्जी व प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ देण्यात येणार असल्याची घोषणा महोत्सवाचे अध्यक्ष व संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. याबरोबर प्रसिद्ध संगीतकार उत्तम सिंग यांना कलेच्या क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल ‘एस. डी. बर्मन इंटरनॅशनल अॅवॉर्ड’ जाहीर झाला असून अॅनिमेशन क्षेत्रात केलेल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल राम मोहन यांना ‘डीएसके पिफ लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड-२०१६ ईन अॅनिमेशन’ या पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
हे सर्व पुरस्कार गुरुवार दिनांक, १४ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता सिटी प्राईड कोथरूड येथे होणा-या कार्यक्रमात प्रदान करण्यात येतील. अनेक मान्यवर व्यक्ती यावेळी उपस्थित असतील असेही डॉ. पटेल यावेळी म्हणाले.
याप्रसंगी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे सचिव रवी गुप्ता, खजिनदार राजेंद्र केळशीकर, क्रिएटिव्ह हेड अभिजित रणदिवे, सिम्बायोसिसच्या संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, डीएसके इंटरनॅशनल कॅम्पसच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालिका तन्वी कुलकर्णी, एनएएफआय चे संचालक प्रकाश मकदूम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना जब्बार पटेल म्हणाले, ”पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दरवर्षी चित्रपट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या व्यक्तींचा सन्मान केला जातो. याहीवर्षी ही परंपरा कायम ठेवत प्रसिद्ध अभिनेते व कवी सौमित्र चॅटर्जी आणि प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ देत गौरव केला जाणार आहे. पुणेरी पगडी, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असेल. याबरोबरच प्रसिद्ध संगीतकार उत्तम सिंग यांना कलेच्या क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल ‘एस. डी. बर्मन इंटरनॅशनल अॅवॉर्ड’ तर अॅनिमेशन विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल राम मोहन यांचाही गौरव केला जाणार आहे.”
यावेळी महोत्सवात दाखल झालेल्या मराठी चित्रपट स्पर्धात्मक विभागाच्या अंतिम फेरीत निवड करण्यात आलेल्या सात चित्रपटांच्या नावाची घोषणाही डॉ. जब्बार पटेल यांनी केली. यावर्षी विभागाच्या अंतिम फेरीत नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’, उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ‘हाय वे’, मकरंद माने यांचा ‘रिंगण’, शिवाजी लोटन पाटील यांचा ‘हलाल’, प्रसाद नामजोशी दिग्दर्शित ‘रंगा पतंगा’, महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘नटसम्राट’ व आदिश केळुस्कर दिग्दर्शित ‘कौल’ या मराठी चित्रपटांचा समावेश असणार आहे.
या वर्षीच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी प्रसिद्ध दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर गोविंद निहलानी, सर्बियाचे चित्रपट समीक्षक नेनाड ड्युकिक, डेन्मार्कचे दिग्दर्शक नील्स मल्म्रोज, भारताच्या अभिनेत्री मलाया गोस्वामी, अर्जेंटीनाचे दिग्दर्शक पाब्लो सीझर, इटलीचे दिग्दर्शक फॅब्रिझिओ फेरारी, अमेरिकेचे दिग्दर्शक डॅनियल रेन व इराणच्या दिग्दर्शक रेझा डॉर्मिशियन हे ज्युरी म्हणून काम पाहतील याबरोबरच भारतातील विविध देशांच्या दूतावासाचे राजदूत, चित्रपट क्षेत्रातील मान्यवर, शहरातील अनेक मान्यवर व्यक्ती यावेळी उपस्थित असतील, अशी माहितीही यावेळी डॉ. जब्बार पटेल यांनी दिली.
याबरोबरच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ लघुपट स्पर्धात्मक विभागामधील चित्रपटांचीही घोषणा यावेळी करण्यात आली. यामध्ये कोकण बीचेस आणि स्कुबा डायव्हिंग विभागात दिलीपकुमार डोंगरे दिग्दर्शित ‘मालगुंडा- शांत, निसर्गरम्य किनारा’, स्वप्नील पवार दिग्दर्शित ‘कोकण’, मनोज जानवेकर आणि संतोष भंडारे दिग्दर्शित ‘कम इट्स अवर ओन कोकण’, दिनेश जगताप दिग्दर्शित ‘येतासका… देवबाग संगमाक’ आणि संदीप माने दिग्दर्शित ‘हाईड अँड सीक’ या चित्रपटांचा समावेश आहे.
याशिवाय वाईल्ड लाईफ ऑफ विदर्भ – ताडोबा या विभागात दिलीपकुमार दोग्रे यांचा ‘ताडोबा’, महेश लिमये यांचा ‘वाघोबा’, ऐश्वर्या श्रीधर यांचा ‘दि ज्वेल ऑफ विदर्भ’, स्वप्नील पवार दिग्दर्शित ‘ताडोबा डायरीज’ आणि अनिल दामले दिग्दर्शित ‘विदर्भ – टायगर कॅपिटल ऑफ वर्ल्ड’ या चित्रपटांचा समावेश आहे.
तसेच औरंगाबाद एक पर्यटन स्थळ – बिवी का मकबरा या विभागात सोमनाथ जगताप दिग्दर्शित ‘अन्वा – ए फरगॉटन हिस्टरी’ रमेश होल्बोले दिग्दर्शित ‘दि ब्युटी ऑफ बिवी का मकबरा’, प्रवीण कौलगी दिग्दर्शित ‘औरंगाबाद’, योगेश शर्मा दिग्दर्शित ‘औरंगाबाद अॅज टुरीस्ट डेस्टीनेशन’ आणि महेश चिंचोळकर व अंकुर थेपडे दिग्दर्शित ‘औरंगाबाद .. दि सिटी ऑफ हिस्टरी’ या चित्रपटांचा समावेश आहे.
महोत्सवाचे हे १४ वे वर्ष असून ‘स्पोर्टस् अॅण्ड सिनेमा ब्रिंग द वर्ल्ड टुगेदर’ असा यावर्षीच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा विषय आहे. हा महोत्सव येत्या १४ ते २१ जानेवारी दरम्यान रंगणार असून पुणे शहरातील कोथरूड सिटी प्राईड, सातारा रस्ता सिटी प्राईड, आर डेक्कन सिटी प्राईड, मंगला मल्टीप्लेक्स, कॅम्प मधील आयनॉक्स, लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय व पिंपरी-चिंचवड मधील जय गणेश आयनॉक्स या ठिकाणी महोत्सवातील चित्रपट दाखविले जाणार आहेत.