पंतप्रधान मोदी: हा करार उभय देशांमधील दृढ मैत्री, सामायिक दूरदृष्टी आणि विश्वास प्रतिबिंबित करतो आणि हा करार आपल्या द्विपक्षीय आर्थिक संबंधांच्या एका नवीन युगाची सुरुवात करेल.
अबू धाबीचे युवराज आणि यूएई सशस्त्र दलाचे उप सर्वोच्च कमांडर मोहम्मद बिन झाएद अल नाहयान आणि भारताचे पंतप्रधान महामहिम नरेंद्र मोदी यांच्या व्हर्चुअल उपस्थितीत या ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी करण्यात आली
मोहम्मद बिन झायेद: राष्ट्रपती खलिफा यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त अरब अमिराती व्यापार आणि गुंतवणुकीचे प्रवेशद्वार म्हणून जागतिक स्तरावर आपले स्थान मजबूत करत आहे.
सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारामुळे (सीईपीए) द्विपक्षीय व्यापार पाच वर्षांत 100 अब्ज डॉलर्सवर जाणे आणि दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होणे अपेक्षित आहे
संयुक्त अरब अमिरातीच्या 50 प्रकल्पांतर्गत दोन्ही देशांच्या संबंधित दीर्घकालीन आर्थिक विकास योजनांमध्ये उभय नेत्यांच्या सामायिक दूरदृष्टीचा पाठपुरावा करण्याच्या अनुषन्गाने सीईपीए हा एक महत्त्वाचा टप्पा आहे
मुंबई-
आज, 18 फेब्रुवारी 2022 रोजी, अबू धाबीचे युवराज आणि यूएई सशस्त्र दलाचे उप सर्वोच्च कमांडर आणि कार्यकारी परिषदेचे अध्यक्ष महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान, आणि भारताचे पंतप्रधान महामहिम नरेंद्र मोदी यांनी व्हर्च्युअल शिखर परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत दोन्ही नेत्यांनी उभय देशांमधील ऐतिहासिक आणि मैत्रीपूर्ण संबंधांची भविष्यातील कल्पना मांडली. आज भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे आणि संयुक्त अरब अमिराती त्याच्या स्थापनेची 50 वर्षे साजरी करत असताना हे महत्वपूर्ण ठरले आहे.
भारत- संयुक्त अरब अमिराती व्यापक आर्थिक भागीदारी करारावर (India-UAE CEPA) स्वाक्षरीच्या वेळी दोन्ही देशांतील संबंधित वाणिज्य आणि उद्योग/अर्थमंत्री उपस्थित होते. भारत- युएई सीईपीए हा संयुक्त अरब अमिराती चा पहिला द्विपक्षीय व्यापार करार आहे तर मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका प्रांतातील ( MENA ) भारताचा पहिला द्विपक्षीय व्यापार करार आहे. महामारीच्या काळात द्विपक्षीय संबंधांमध्ये सीईपीए हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे आणि एक प्रमुख व्यापार करार आहे जो दोन्ही देशांमधील धोरणात्मक सहकार्याचे नवीन पर्व सुरू करेल. यामुळे द्विपक्षीय आर्थिक आणि गुंतवणूक संबंधांमध्ये परिवर्तन घडेल, आफ्रिका आणि आशिया दरम्यान उदयोन्मुख व्यापार मार्ग खुले करेल, जागतिक व्यापार उदारीकरणाला चालना देईल आणि कोविड नंतरच्या काळात आर्थिक वाढीला गती देईल.
“संयुक्त अरब अमिराती , राष्ट्राध्यक्ष महामहिम शेख खलिफा बिन झायेद अल नाह्यान यांच्या नेतृत्वाखाली, व्यापार आणि गुंतवणुकीचे प्रवेशद्वार म्हणून जागतिक स्तरावर आपले स्थान बळकट करत आहे,असे महामहिम शेख खलिफा बिन झायेद अल नाह्यान यांनी सांगितले. “भारत हा आमच्या सर्वात महत्त्वाच्या धोरणात्मक भागीदारांपैकी एक आहे आणि हा करार आमचे संबंध पूर्वीपेक्षा अधिक दृढ करणारा आहे. आज आम्ही पंतप्रधान मोदींसोबत जो करार केला आहे, तो केवळ जवळच्या भागीदारासोबतचे आमचे आर्थिक आणि व्यापारी संबंध अधिक घनिष्ठ करत नाही तर आमच्यासाठी जागतिक सहकार्याच्या एका नवीन टप्प्याचे द्वार उघडतो.”, असे ते म्हणाले.
महामहिम पुढे म्हणाले,“ हा ऐतिहासिक आर्थिक करार आमच्या पुढील 50 वर्षांच्या प्रगती आणि समृद्धीसाठीच्या प्रयत्नात सुरू केलेल्या 50 धाडसी प्रकल्पांसाठी आमच्या नेत्यांची वचनबद्धता दर्शवितो.विकासाला चालना देणे आणि जगासोबतचा आपला व्यापार दुप्पट करणे तसेच संयुक्त अरब अमिरातीची ज्ञान आणि नवोन्मेष -आधारित अर्थव्यवस्था बळकट करणे हा उद्देश असलेल्या, दूरगामी दृष्टीकोनाचा भविष्यातील पिढ्यांना फायदा होईल.आफ्रिकेपासून आशियापर्यंतच्या व्यापार मार्गिकेमध्ये नवी पहाट होत असताना आणि संपूर्ण क्षेत्राला फायदा होईल अशा विकासाचा आणि समृद्धीचा पाया रचत असताना, हा करार संयुक्त अरब अमिरात आणि भारतीय उद्योगांना कमी दर आणि बाजारपेठेतील प्रवेश वाढण्यासह महत्त्वपूर्ण फायदे प्रदान करण्याचे वचन देतो”.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले:आज आपल्या दोन्ही राष्ट्रांमधील सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षरी करताना मला आनंद होत आहे.हा महत्त्वपूर्ण करार हा 3 महिन्यांपेक्षा कमी विक्रमी कालावधीत पूर्ण झाला आहे, ही उल्लेखनीय बाब आहे. असे करार पूर्णत्वाला जाण्यासाठी साधारणपणे वर्षे लागतात. हा करार दोन्ही देशांमधील घनिष्ठ मैत्री, सामायिक दृष्टीकोन आणि दृढ विश्वास दर्शवतो.मला विश्वास आहे की, यामुळे आमच्या द्विपक्षीय आर्थिक संबंधांमध्ये नवीन युगाची सुरुवात होईल आणि येत्या 5 वर्षात द्विपक्षीय व्यापाराचे प्रमाण सध्याच्या अंदाजे 60 अब्ज अमेरिकी डॉलर्सवरून 100 अब्ज अमेरिकी डॉलर्स पर्यंत वाढेल.”
भारत आणि संयुक्त अरब अमिराती दरम्यानचे द्विपक्षीय संबंध गेल्या काही वर्षांमध्ये परस्पर हिताच्या सर्व क्षेत्रात बळकट झाले आहेत ;उभय देशांनी 2017 मध्ये सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी सुरू केली होती. दोन्ही देशांचे नेते गेल्या काही वर्षांपासून नियमित संपर्कात आहेत, विशेषत: कोविड-19 महामारीच्या काळात महामारीचा सामना करण्यासाठी उभय देशांनी आरोग्य सेवा आणि अन्न सुरक्षेसारख्या महत्वाच्या क्षेत्रांमध्ये एकत्रित सहकार्य केले आहे.दोन्ही पक्षांमधील मंत्रीस्तरीय भेटीही सुरूच आहेत. याच धोरणात्मक भागीदारीने दोन्ही देशांदरम्यान आज स्वाक्षरी झालेल्या सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराचा (सीईपीए ) पाया रचला आहे.
भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमधील द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक आणि ऊर्जा संबंध मजबूत राहिले आहेत.सीईपीएवर स्वाक्षरी करणे हे या दीर्घकालीन द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक संबंधांचे गमक आहे.हरित हायड्रोजन, हवामान बदलासंदर्भातील कृती , स्टार्ट-अप्स, कौशल्ये , आर्थिक तंत्रज्ञान आणि आरोग्य तंत्रज्ञान यांसारख्या नवीकरणीय उर्जेच्या नवीन क्षेत्रांमध्ये दोन्ही देश त्यांचे सहकार्य बळकट करत आहेत.संयुक्त अरब अमिरात हा भारताचा तिसरा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे आणि हा द्विपक्षीय व्यापार चालू आर्थिक वर्षात 60 अब्ज अमेरिकी डॉलर्सचा टप्पा ओलांडण्याची अपेक्षा आहे. बिगर – तेल निर्यातीसाठी संयुक्त अरब अमिरातीचा पहिल्या क्रमांकाचा व्यापारी भागीदार म्हणून भारताचा क्रमांक लागतो,.जागतिक स्तरावर संयुक्त अरब अमिरातीच्या एकूण गैर-तेल निर्यातीपैकी सुमारे 14 टक्के वाटा भारताचा आहे. सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारामुळे ,पाच वर्षांत द्विपक्षीय व्यापाराचे एकूण मूल्य 100 अब्ज अमेरिकी डॉलर्सपेक्षा जास्त वाढू शकते.उभय देशांतील लोकांना शाश्वत कल्याण आणि निरामयता प्रदान करणाऱ्या भविष्यासाठी बळकट आणि अधिक लवचिक अर्थव्यवस्थांसाठी या ऐतिहासिक व्यापार कराराच्या माध्यमातून सामायिक दृष्टीकोनासाठी मार्गदर्शक आराखडा तयार करणे अपेक्षित आहे.

