नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी 2021
प्राप्तिकर विभागाने 08.02.2021 रोजी मुंबईतील एका समूहाविषयी शोध आणि सर्वेक्षण कार्ये केली. हा समूह आतिथ्य क्षेत्रात काम करण्याव्यतिरिक्त प्रामुख्याने गुटखा, पान मसाला आणि संबंधित पदार्थांच्या उत्पादनामध्ये व्यस्त आहे. भारतातील विविध भागात शोधमोहीम 13.02.2021 पर्यंत राबवण्यात आली. या मोहिमेत आत्तापर्यंत सुमारे 1500 कोटी रुपयांच्या बेहिशोबी व्यवहारांची माहिती उघड झाली आहे.
शोध आणि जप्ती कारवाईमुळे टॅक्स हेवन असणाऱ्या ब्रिटीश व्हर्जिन आयलँड्स (बीव्हीआय) मध्ये नोंदणीकृत असलेल्या तसेच दुबईत कार्यालय असलेल्या आणि या समूहाच्या अध्यक्षांच्या नियंत्रणाखाली असलेल्या कंपनीकडे असलेल्या परदेशी मालमत्तांचा शोध लागला आहे. भारतातून जमवलेल्या निधीतून बीव्हीआय कंपनीची निव्वळ मालमत्ता 830 कोटी रुपये आहे. हा निधी 638 कोटी रुपये किमतीच्या शेअर्स प्रीमियमच्या स्वरूपात भारतातील गटाच्या प्रमुख कंपन्यांमध्ये पुन्हा वळविण्यात आला आहे. शोधमोहिमेदरम्यान गटाच्या प्रवर्तकांद्वारे कंपनीचे नियंत्रण आणि व्यवस्थापन स्थापित केल्यासंबंधीचे विविध डिजिटल पुरावे आणि फॉरेन्सिक विश्लेषणाने ईमेल संप्रेषण प्राप्त केले आहे. बीव्हीआय कंपनीत भागधारक असलेल्या कर्मचार्यांपैकी एकाची ओळख पटली असून प्रवर्तकासोबत त्याची उलट तपासणी घेण्यात आली. त्यात सहभागी असलेल्या पक्षकारांनी हे मान्य केले आहे की कर्मचार्याला कंपनीत भागधारक असल्याची माहिती नव्हती आणि मुख्य प्रवर्तकांच्या निर्देशानुसार त्याने कागदपत्रांवर सही केली होती.
पुढे असेही आढळले आहे की या समूहाने प्राप्तिकर अधिनियम 1961 च्या कलम 80IC अंतर्गत 398 कोटी रुपयांपर्यंतच्या बनावट वाजवटीचा लाभ घेतला आहे. या समूहाने हिमाचल प्रदेशात दोन संस्था स्थापन केल्या आणि उपरोक्त बनावट वाजवटीचा दावा करण्यासाठी हा समूह लबाडीचा व्यवहार करीत असल्याचे आढळले.
या व्यतिरिक्त समुहाच्या दोन कारखाना परिसरात 247 कोटी रुपये किमतीच्या बेहिशोबी पान मसाल्याचे उत्पादन होत असल्याचेही शोध मोहिमेत आढळून आले आहे.
असेही दिसून आले आहे की करदात्याने प्राप्तिकर अधिनियम 1961 च्या कलम 10AA च्या अंतर्गत गांधी धाम युनिटमध्ये 63 कोटी रुपये वजावटीचा खोटा दावा केला आहे.
शोध कारवाई दरम्यान 13 लाख रुपयांची रोकड आणि 7 कोटी रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले. 16 लॉकरवर आणि 11 ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आले आहेत. अशाप्रकारे, या शोध कारवाईत आत्तापर्यंत सुमारे 1500 कोटी रुपयांच्या बेहिशोबी व्यवहारांची माहिती उघड झाली आहे.
पुढील तपास सुरू आहे.

