पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचा दावा
नवी दिल्ली, 12 एप्रिल 2020
कोविड-19 च्या आर्थिक प्रतिसादाचा भाग म्हणून, भारत सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत (पीएमजीकेवाय) अनेक उपक्रम राबविण्याची घोषणा केली आहे. कोरोना विषाणूमुळे गरीब जनतेसमोर अनेक आर्थिक अडचणी उद्भवलेल्या आहेत त्या दूर करण्याच्या उद्देशाने हे उपक्रम जाहीर केले आहेत. या योजनेनुसार, एप्रिल ते जून 2020 या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (पीएमयुवाय) लाभार्थ्यांना मोफत एलपीजी सिलेंडर देण्यात येणार आहे.
आतापर्यंत,तेल विपणन कंपन्यांनी पीएमजीकेवाय अंतर्गत एलपीजी सिलेंडर मोफत मिळवण्यासाठी 7.15 कोटी पीएमयुवाय लाभार्थ्यांच्या खात्यात सुरुवातीच्या टप्प्यात 5,606 कोटी रुपये जमा केले आहेत. या महिन्यात लाभार्थ्यांनी 1.26 कोटी सिलेंडरची बुकिंग केली आहे, ज्यापैकी 85 लाख सिलेंडर पीएमयुवाय लाभार्थ्यांना देण्यात आले आहेत.
सध्या देशात 27.87 कोटी सक्रीय एलपीजी ग्राहक आहेत आणि पीएमयुवाय लाभार्थ्यांची संख्या 8 कोटींहून अधिक आहे. लॉकडाऊन झाल्यापासून देशात दररोज 50 ते 60 लाख सिलेंडर वितरीत होत आहेत. देशव्यापी लॉकडाऊन सुरु असताना लोकं सुरक्षित राहण्यासाठी घरातच थांबत आहेत. त्याचवेळी, लोकांना त्यांच्या घरापर्यंत थेट स्वच्छ इंधन मिळावे यासाठी एलपीजी वितरण करणारे कर्मचारी आणि एलपीजी वितरण शृंखलेतील सर्व लोकं अथक परिश्रम करत आहेत.
पर्वतीय प्रदेशापासून बॅकवॉटर्सपर्यंत, वाळवंटातील वाड्यांपर्यंत, जंगलांमध्ये वस्तीपर्यंत हे कोरोना योद्धा आपले कर्तव्य चोख बजावत असून एलपीजीचे वितरण वेळेवर होईल हे सुनिश्चित करत आहेत. या कठीण काळातही सिलेंडर साठीचा प्रतीक्षा कालवधी 2 दिवसांपेक्षा कमी आहे. एलपीजी वितरण शृंखलेत आपले कार्य बजावताना शोरूम कर्मचारी, गोदाम कर्मचारी, मेकॅनिक्स आणि वितरण कर्मचाऱ्यांचा कोविड-19 चा संसर्ग होऊन जर मृत्यू झाला तर आयओसीएल,बीपीसीएल आणि एचपीसीएल या तेल विपणन कंपन्यांनी अशा कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
31 मार्च 2020 पर्यंत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत एलपीजी कनेक्शन घेतलेले सर्व ग्राहक प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा लाभ मिळण्यास पात्र आहेत. ही योजना 1 एप्रिल 2020 पासून सुरू झाली आहे आणि 30 जून 2020 पर्यंत सुरू राहील. या योजनेंतर्गत तेल विपणन कंपन्या पीएमयूवाय ग्राहकाच्या लिंक केलेल्या बँक खात्यात पॅकेजच्या प्रकारानुसार 14.2 किलो रिफिल किंवा 5 किलो रिफिलच्या विक्री किंमतीनुसार आगाऊ रक्कम हस्तांतरित करीत आहेत. एलपीजी सिलेंडर घेण्यासाठी ग्राहक या पैशाचा उपयोग करू शकतात.

