नवी दिल्ली-मुंबईत वांद्रे टेलिफोन एक्सचेंजच्या इमारतीत आणि कोलकात्यामध्ये सॉल्ट लेक येथे बीएसएनएल इमारतीत काल मोठी आग लागली. तसेच दिल्लीत किडवाई भवनमध्ये लहानशी आग लागली. या आगींच्या घटनांची चौकशी करण्याचे आदेश दूरसंचारमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी दिले आहेत. तसंच बीएसएनएल आणि एमटीएनएल यांनी आपापल्या इमारतींचे नव्याने अग्निसर्वेक्षण करावे, असे त्यांनी सांगितले आहे. मुंबईत 22 जुलै 2019 रोजी एमटीएनएलच्या इमारतीला दुपारी तीनच्या सुमाराला आग लागली होती आणि अग्निशमन दलाने व्यापक मदतकार्य राबवून ती दुसऱ्या दिवशी पहाटे पूर्णपणे नियंत्रणात आणली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या इमारतीत असलेल्या टेलिफोन लाईन्स आणि इतर सामग्रीचे नुकसान झाल्याने 25000 दूरध्वनी ग्राहक आणि 8000 इंटरनेट ग्राहकांची सेवा बंद आहे. ही सेवा पुढल्या चार दिवसात सुरू होण्याची शक्यता आहे.
पश्चिम बंगालमध्ये कोलकात्यात सॉल्ट लेक भागातल्या बीएसएनएलच्या इमारतीला देखील 22 जुलै 2019 रोजी आग लागली. ही आग दुसऱ्या दिवशी पहाटे आटोक्यात आणण्यात आली. यामुळे मोबाईल सेवांवर परिणाम झाला असला तरी बऱ्याच प्रमाणात मोबाईल सेवा पूर्ववत झाल्या असून अंदमान निकोबार भागातल्या सेवा येत्या चार दिवसात पूर्ववत केल्या जाणार आहेत. दिल्लीच्या किडवाई भवनमधल्या एमटीएनएल कार्यालयात लहानशी आग लागली होती. ही आग काही तासांतच आटोक्यात आली.